पोतदारांची कन्या शरयू पोतदार चमकली; शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदविला तेजस्वी ठसा
घोटी
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता विद्यालयाची हुशार व मेहनती विद्यार्थिनी कु. शरयू श्रीनिवास पोतदार हिने सन २०२५ मध्ये आयोजित इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती पात्र गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. वयाच्या तेराव्या वर्षीच तिने दाखविलेला अभ्यासातील नेम, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण चिकाटी तिच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा स्पष्ट करणारी आहे.
शरयूने आपल्या अभ्यासाला केंद्रस्थानी ठेवून परिश्रमांची पराकाष्ठा केली. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि स्वतःची आत्मविश्वासपूर्ण तयारी याच्या जोरावर तिने हे यश मिळवले. तिच्या या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल जनता विद्यालयासह संपूर्ण घोटी परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शरयूच्या यशाचा सत्कार करण्यासाठी मविप्र संस्था आणि स्थानिक स्कूल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रोत्साहनपर दोन हजार रुपयांचा धनादेश देऊन शरयूचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संचालक संदीप भाऊ गुळवे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजू जाधव, मुख्याध्यापक एस. ए. पाटील, उपमुख्याध्यापक यु. डी. पवार, पर्यवेक्षक एच. आर. चौधरी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांनी शरयूच्या यशाची प्रशंसा करत तिची चिकाटी, परिश्रमशीलता व अभ्यासू वृत्ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आगामी काळात ती आणखी मोठ्या परीक्षांमध्ये व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये चमकून विद्यालयाचे व घोटी गावाचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरयूच्या यशामुळे तिच्या आई-वडिलांवर आनंदाचा वर्षाव झाला असून त्यांनी शिक्षक व विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणाच्या वाटेवर दृढनिश्चयाने पुढे जात असलेल्या शरयूसारख्या विद्यार्थ्यांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढत असल्याचे समाधान शिक्षकांनी व्यक्त केले. शरयू पोतदार हिच्या या उज्ज्वल कामगिरीने घोटी गावाला अभिमानाचा क्षण प्राप्त झाला आहे.
