टाकळी शाळा व परिसरात जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात साजरा

अकोले प्रतिनिधी

“सहानुभूती नव्हे, विश्वास द्या; प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ द्या” या प्रेरणादायी संकल्पनेतून समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत समता सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी, धुमाळवाडी, अकोले खुर्द तसेच फिजिओथेरपी सेंटर अकोले येथे जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

केंद्रशाळा टाकळी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विठे केंद्राचे विशेष शिक्षक श्री. संदिप कडवे आणि अकोले तालुका संसाधन कक्षाच्या काळजीवाहक सौ. मनिषा झोळेकर उपस्थित होते.

प्रस्ताविक भाषणात टाकळी केंद्रशाळेचे विशेष शिक्षक श्री. कैलास झोळेकर यांनी जागतिक दिव्यांग दिवसाचे महत्त्व, दिव्यांग बालकांचे अधिकार आणि समाजातील त्यांच्या समतेची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. कडवे यांनी थोर अमेरिकन दिव्यांग लेखिका हेलन केलर यांच्या अदम्य जीवनप्रवासाची प्रेरणादायी माहिती दिली.

मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या संघर्षमय जीवनचरित्राची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. सहशिक्षक श्री. देवगिरे यांनी टाकळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु. गौरी दातखिळे हिच्याविषयीचा भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव कथन केला.

अध्यक्षीय भाषणात श्री. संजय देशमुख यांनी कोकणकडा सर करून विश्वविक्रम नोंदवणाऱ्या दिव्यांग साहसवीर केशव भांगरे यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सहशिक्षिका श्रीमती संगिता धिंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि समाजात समावेशकतेचा संदेश पोहोचविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!