राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा गौरव सोहळा उत्साहात संपन्न
संगमनेर (प्रतिनिधी)~
राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर गुरुजी प्रतिष्ठान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा येथील भंडारी मंगल कार्यालयात उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने सोमनाथ कळसकर गुरुजी यांचेही अभिष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संपतराव तनपुरे होते.
यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष द. मा. ठुबे गुरुजी, सौ. नलिनीताई कळसकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामनाथ कळसकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंटे, पेन्शनर संघटनेचे बा. की. कर्पे, सुभाष पोखरकर, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख किसनभाऊ हासे, पुणे येथील जलसंपदा विभागाचे उप मृद संरक्षण अधिकारी रणजीतसिंह माचरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी कळसकर गुरुजी यांच्या आठवणी विशद करतांना या वयातही नित्य नियमाने ते फिरत असतात. हे पाहून आम्हालाही अप्रूप वाटते. कांजरभाट समाज शिक्षणापासून कोसो मैल दूर होता; मात्र कळसकर गुरुजींनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आपल्या पायावर उभे केले असे मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष द. मा. ठुबे यांनी कळसकर गुरुजी यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. कळसकर गुरुजी यांनी घडविलेले विद्यार्थी व सध्या पुणे येथे जलसंपदा विभागाचे उप मृद संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रणजीतसिंह माचरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना— माझ्यासारख्या कांजरभाट समाजातील अनेक दुर्लक्षित विद्यार्थ्यांना जीवनात उभे करण्याचे काम कळसकर गुरुजींनी केले, गुरुजी आमच्यासाठी परमेश्वरा इतकेच प्रिय आहेत, असे सांगितले. “शिका, संघटित व्हा आणि स्वतःचा विकास करा” ही शिकवण कळसकर गुरुजी व बाईंनी दिल्याचे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशनचे सरचिटणीस संपतराव तनपुरे यांनी अनाथांना माया लावणारे कळसकर दांपत्य यांना दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारमूर्ती सोमनाथ कळसकर गुरुजींनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देत शाळा व प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे सचिव गणेशलाल बाहेती यांनी, तर प्रास्ताविक प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख किसनभाऊ हासे यांनी केले. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंटे यांनी पुरस्कार्थींची माहिती दिली. सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य सोमनाथ मदने यांनी केले तर आभार उपाध्यक्ष दीपक थेटे यांनी मानले.
याप्रसंगी डी. बी. राठी, डॉ. सोमनाथ सातपुते, प्रतिष्ठानचे सरचिटणीस डॉ. योगिता कळसकर, ॲड. मितेश जोंधळे, कायदे विषयक सल्लागार ॲड. रंजना गवांदे, खजिनदार ॲड. संग्राम जोंधळे, प्रसिद्धी प्रमुख व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य, अशोक नवले, दीपक घाडगे, सुरेश जाजू, बाळासाहेब वडितके, सुखदेव इल्हे, अशोक मणियार, राजेंद्र चांडक, प्रा. डॉ. नारायण जाधव, सुभाष दरक, अशोक गवांदे, मधुकर बिबवे, रामदास सदगीर, अजय जाजू, कृष्णा वालझाडे, गणपत बिबवे, इंद्रजित गुळवे, सुनिता सुर्वे तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य, कळसकर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे नातेवाईक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेते
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात आले—
- राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार : श्रीकांत काटेलवार (गडचिरोली)
- राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार : रमेश खरबस (अकोले)
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार : निता शिवाजी सावंत (संगमनेर)
- राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार :
- पोखरी हवेली (संगमनेर)
- विरभद्रनगर – वडगाव पान (संगमनेर)
- कळस बु. (अकोले) जिल्हा परिषद शाळा
