संगमनेर सेवा समितीने यशानंतर थेट जनसेवेला सुरुवात : संगमनेर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम

संगमनेर (प्रतिनिधी) :

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे व सर्व नगरसेवकांनी निवडणूक विजयाचा जल्लोष न करता थेट जनसेवेला प्राधान्य देत शहर स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. संगमनेर बस स्थानक परिसर व नाशिक–पुणे महामार्गावरील लक्ष्मी रोड परिसरात हातात झाडू घेऊन त्यांनी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात संगमनेर हायटेक बस स्थानक येथील दत्त मंदिरात करण्यात आली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत डॉ. मैथिलीताई तांबे व सर्व नगरसेवकांनी दत्ताची आरती करून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सौ. सीमाताई खटाटे, भारत बोराडे, सौ. अर्चना सुभाष दिघे, सौरभ कासार, सौ. शोभाताई पवार, सौ. प्राची काशीद, किशोर पवार, डॉ. अनुराधा सातपुते, सौ. वनिता गाडे, गजेंद्र अभंग, सौ. मालती डाके, नितीन अभंग, सौ. दिपाली पांचारिया, अमजद खान पठाण, डॉ. दानिश, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजित काकडे, सतीश आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर शहरातील हायटेक बस स्थानक परिसर हा शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून मागील एक वर्षात अनधिकृत फ्लेक्समुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती. नव्या पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेत रात्री बस स्थानक व नाशिक–पुणे रोडवरील ऑरेंज कॉर्नर ते बस स्थानक हा संपूर्ण मार्ग धुऊन काढला. त्यानंतर सकाळी प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले, “संगमनेरला सुसंस्कृत राजकारणाची समृद्ध परंपरा आहे. संगमनेर हे एक कुटुंब असून सर्व समाज घटक येथे गुण्यागोविंदाने राहतात. ही परंपरा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पुढे न्यावी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करून जनतेची सेवा करावी.” सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, “स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर ही आपली संकल्पना आहे. डॉ. मैथिलीताई तांबे व सर्व नगरसेवक प्रभावी काम करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवतील व शहराला देशात अग्रगण्य बनवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या, “संगमनेरच्या जनतेने आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. निवडणूक संपली की राजकारण संपते, हीच आपली संस्कृती आहे. सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करू आणि स्वच्छ शहराची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवू.” या स्वच्छता मोहिमेला संगमनेर शहरातील युवक कार्यकर्ते, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!