प्रतिभेच्या कॅनव्हासवर कलेच्या जोरावर अदिती पोतदारने गाठले ‘ए’ श्रेणीचे शिखर
इगतपुरी – घोटी (प्रतिनिधी)
इगतपुरी–घोटी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालयाची गुणवंत विद्यार्थीनी कु. अदिती श्रीनिवास पोतदार हिने सन २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या शासकीय इंटरमिडिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत ‘ए’ श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयासह संपूर्ण इगतपुरी–घोटी परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहानपणापासून चित्रकलेची विशेष आवड असलेल्या अदितीने सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि कलात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. रेखाटनातील अचूकता, रंगसंगतीची जाण आणि कल्पक सादरीकरण ही तिच्या चित्रांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शासकीय चित्रकला परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी आणि भविष्यातील कला शिक्षणासाठी दिशादर्शक मानली जाते. अशा महत्त्वाच्या परीक्षेत ‘ए’ श्रेणी प्राप्त करणे हे अदितीच्या मेहनतीचे फळ असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक संदीप गुळवे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजू जाधव, मनोज जाधव, मार्केट कमिटीचे भरत आरोटे, अनिल काळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. भामरे, उपमुख्याध्यापक यु. डी. पवार, पर्यवेक्षक एच. आर. चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कु. अदितीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही तिच्या यशाचे कौतुक केले.
अदितीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचा मोलाचा पाठिंबा असून त्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. आपल्या मुलीच्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात अदितीने चित्रकलेच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन राज्य व देशपातळीवर नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कु. अदिती पोतदारच्या या यशामुळे जनता विद्यालयाची शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ झाली आहे.
