टाकळी (अकोले) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
अकोले प्रतिनिधी
टाकळी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे सालाबादाप्रमाणे स्वराज्याची संस्कारशाळा असलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२८ वी जयंती तसेच थोर समाजसुधारक, राष्ट्रपुरुष महान योगी स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री. दत्तात्रय देवगिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उंचखडक खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. वाकचौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी केले.
या जयंतीनिमित्त सहशिक्षिका श्रीमती संगिता धिंदळे व श्रीमती निता लेंभे यांनी शाळेतील लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धांचे प्रभावी नियोजन केले. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम नेतृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रउभारणीसाठीच्या विचारांवर अभ्यासपूर्ण निबंध सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक श्री. संजय देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे चित्र दिसून आले.
