सावित्रीच्या लेकींनी साजरी केली ज्ञानज्योतीची जयंती; टाकळी शाळेत प्रेरणादायी उपक्रम
अकोले प्रतिनिधी
“समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली” या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व महान शिक्षणतज्ज्ञ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती अर्थात राष्ट्रीय बालिका दिन व महिला मुक्ती दिन अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी केंद्राच्या सन्माननीय केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून टाकळी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. शोभा भरीतकर उपस्थित होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समितीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यात आदर्श केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे, बचत गट कार्यकर्त्या शोभा भरीतकर, पद्मावती सुर्वे, परिघाताई फोडसे, सविताताई वारुंघुसे, टाकळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी साबळे, अंगणवाडी सेविका विद्या तिकांडे, उपक्रमशील शिक्षिका संगीता धिंदळे, युवा स्वयंसेविका निता लेंभे तसेच स्वयंपाकी मदतनीस कमल चासकर, छाया नाईकवाडी व सुरेखा घोलप यांचा समावेश होता.
तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व “सावित्रीच्या लेकींना” गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून स्त्री शिक्षणाच्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनकार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोहनपुरीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी केले, तर सहशिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख व कैलास झोळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
टाकळी शाळेने राबविलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी विशेष कौतुक केले असून, हा उपक्रम स्त्री शिक्षणाची चळवळ अधिक बळकट करणारा ठरल्याची भावना व्यक्त केली आहे.
