विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे शाळा ; लेखन-वाचनातूनच स्पर्धा परीक्षांचे यश – तहसीलदार धीरज मांजरे
 गगनगिरी विद्यालयात आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ थाटामाटा संपन्न 
पिंपरणे :
“शाळा हे वक्तृत्व स्पर्धेचे खरे व्यासपीठ असून चांगले वक्ते शाळेतच घडत असतात. लेखन व वाचन करताना सर्जनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. लेखन व वाचनामुळेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन संगमनेर तालुक्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले.
शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरणे, संगमनेर साहित्य परिषद व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार धीरज मांजरे, चाकण येथील किल्लेदार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. किरण झिंजुर्के, संगमनेर तालुक्याच्या कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके उपस्थित होते.
यावेळी शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, मोरे सर, दिवानजी पवार, मेजर प्रकाश कोटकर, दिपक क्षत्रिय, सुभाष पवार, संस्थेचे संचालक सुरेशराव ठोंबरे, संस्थेचे उपाध्यक्ष डी.एम. देशमुख, स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोंडीराम बागुल सर, विलास साळवे, माजी मुख्याध्यापक मुकुंद डांगे, मुख्याध्यापक रमेश वाळे, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ॲड. किरण झिंजुर्के यांनी विद्यालयात युवाशक्तीला सशक्त व जागृत करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगत विद्यालयाच्या प्रगतीचा गौरव केला. किल्ल्यांचे प्रकार व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद करून स्वातंत्र्याची प्रेरणा जर आपल्या मनात जागृत झाली, तर आपण प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
संगमनेर तालुक्याच्या कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांनी विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाचे महत्त्व समजावून सांगत स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. ॲड. राहुल देशमुख यांनी इतिहासातील प्रेरणादायी घटनांची माहिती देत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात श्रीमती स्वाती थोरात व नीता रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘जम्हुरी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत शिक्षक गटात सहभागी झाल्याबद्दल ललित शेळके यांचा तसेच पीएच.डी.चा शोधनिबंध यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ज्युनिअर कॉलेजच्या श्रीमती राजश्री मांढरे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माजी प्राचार्य मुकुंद डोगे यांनी करून दिला. प्राचार्य रमेश वाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन ललित शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन बापू खेमनर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!