बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्ती व प्रलंबित योजना सुरू! आमदार व पालकमंत्री यांचे मानले आभार-सौ.रेखा कोटकर !
संगमनेर :
संगमनेर तालुक्यातील नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतील प्रलंबित लाभ अखेर सुरू करण्यात आले असून यासाठी भाजपा तालुका सचिव रेखा सोमनाथ कोटकर यांनी नामदार पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती रेखा कोटकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील अनेक बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, प्रशिक्षण तसेच इतर विविध लाभ गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. यामुळे कामगार वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा तालुका सचिव रेखा कोटकर यांनी संबंधित कामगारांची समस्या गांभीर्याने घेत पालकमंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या कडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे निवेदन देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य त्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याने शिष्यवृत्ती व इतर प्रलंबित लाभांच्या योजनांची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील पात्र बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेकांना शैक्षणिक व प्रशिक्षणाशी संबंधित लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, लाभ पुन्हा सुरू झाल्याबद्दल बांधकाम कामगार तसेच भाजपा तालुका सचिव रेखा सोमनाथ कोटकर यांनी पालकमंत्री व आमदार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
