महाराष्ट्रातील पहिली वृक्ष लागवड स्पर्धा : डॉर्फ केटल जंगल कप व मॅंगो कपमुळे गावागावात हरित क्रांती

संगमनेर 

महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण शाश्वत विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरत असलेल्या डॉर्फ केटल जंगल कप आणि मॅंगो कप या राज्यातील पहिल्या वृक्ष लागवड स्पर्धांमुळे गावागावात हरित चळवळ उभी राहत असून या उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळत असल्याची माहिती शासकीय विश्रामगृह संगमनेर येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, सप्रेम व नवदृष्टी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत कंपनीचे सीएसआर हेड श्री. संतोष जगधने, सप्रेम संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश गायकवाड आणि प्रकल्प समन्वयक हिमांशु लोहकरे यांनी संयुक्तपणे माहिती दिली.

या स्पर्धेत आतापर्यंत राज्यातील ५ जिल्ह्यांमधील तब्बल २३० गावांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी १४० गावांमध्ये मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्मितीचे प्रकल्प यशस्वीपणे उभारण्यात आले आहेत, तर ४९ गावांमध्ये सुमारे १,५०,००० केशर आंबा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे केवळ वृक्ष लागवडच नव्हे तर ग्रामीण भागात पर्यावरणाबाबत जागरूकता, संवेदनशीलता आणि स्वयंस्फूर्ती निर्माण होत आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावांनी पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शेंडेवाडी येथील जलतलाव प्रकल्प, प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना, वृक्ष दिंडी, तसेच “माझी वसुंधरा” अभियानाशी सुसंगत उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. यामुळे गावांचा पर्यावरणीय आणि सामाजिक विकास अधिक सक्षम होत आहे.

या संपूर्ण उपक्रमाला मनरेगा योजनेची जोड, डॉर्फ केटल कंपनीचा सीएसआर निधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त लोकसहभाग लाभत असल्याने ही चळवळ अधिक मजबूत बनत आहे. विशेष म्हणजे, मॅंगो कप अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या केशर आंबा वृक्षांमुळे भविष्यात ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक सक्षमीकरणाचे उद्दिष्टही साध्य होणार आहे.

डॉर्फ केटल जंगल कप ही केवळ स्पर्धा नसून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची लोकचळवळ बनली आहे. या उपक्रमातून “आदर्श अकरा तालुके” निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून भविष्यात अधिक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम विस्तारण्याचे नियोजन आहे.

शासन, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून सुरू झालेली ही हरित चळवळ महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी मॉडेल ठरत असून, येत्या काळात संपूर्ण देशासाठीही हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!