*”हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन;*
*कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आवाहन*
माढा तालुका प्रतिनीधी / हनुमंत मस्तुद
शिखांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे.
*जागतिक विक्रमाची नोंद…*
या विशेष उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या संस्थेकडून घेतली जाणार आहे.
“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या स्मृतीनिमित्त २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील ओवे मैदानात मुख्य ‘शहिदी समागम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गुरुजींच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी गीत गायले असून, हेच गीत २३ फेब्रुवारी रोजी कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमधून सकाळी ९.०० वाजता गायले जाणार आहे.
