शब्दसुमनांचा दरवळ : ‘झाकाळल्या नभात’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी
संगमनेर :
साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा ॲड. सुभाष गोडगे यांच्या ‘झाकाळल्या नभात’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन हॉल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य कला मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘झाकाळल्या नभात’ या काव्यसंग्रहामधून मानवी मनातील भावविश्व, सामाजिक वास्तव, नातेसंबंधांची कोमलता आणि जीवनातील चढ-उतार प्रभावी शब्दांत मांडले आहेत. कवी सुभाष गोडगे यांच्या लेखणीतून उमटलेल्या या काव्यरचना वाचकांना आत्मचिंतनाची दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.
कार्यक्रमात समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आदर्श सार्वजनिक वाचनालयांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच काव्यस्पर्धेतून निवड झालेल्या गुणवंत स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव केला जाणार आहे.
साहित्य, कला आणि संस्कृतीचा उत्सव ठरणाऱ्या या सोहळ्यास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
