विज्ञानाची प्रगती त्यागातूनच झाली – प्रा. लक्ष्मण घायवट

सह्याद्री जुनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा व व्याख्यानमाला

संगमनेर, (प्रतिनिधी)

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धा व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध वैज्ञानिक प्रा. लक्ष्मण घायवट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. खेमनर यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच C. V. Raman यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रा. सुरेश घोरपडे यांनी प्रास्ताविकातून विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विविध वैज्ञानिक प्रयोगांचा आढावा घेतला. विज्ञानवाद रुजवणे हेच मोठे आव्हान
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. लक्ष्मण घायवट यांनी मार्गदर्शनपर भाषणात विज्ञानाच्या विविध अंगांचा ऊहापोह केला. “विज्ञानाची प्रगती ही मुख्यतः त्यागातूनच झाली आहे,” असा ठाम विचार त्यांनी मांडला.आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, त्यावर हजारो किलोमीटर दूर आधीच तंत्रज्ञान विकसित झालेले असते, ही आपली शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. शत्रूपासून संरक्षणासाठी आपण राफेल विमाने खरेदी करतो; मात्र त्यांची पूजा लिंबू-मिरची बांधून करतो, ही विसंगती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंधश्रद्धा, पाप-पुण्याच्या संकल्पना आणि अवैज्ञानिक विचारांमुळे समाजाची प्रगती खुंटते, असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांनी मनगट आणि मेंदू या दोन्हींचा योग्य वापर करून विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एस. एम. खेमनर यांनी विज्ञान दिनाचा इतिहास उलगडला. १९२८ साली रामन परिणाम या शोधाची घोषणा झाली. त्यानंतर १९८७ पासून भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्या काळात पंतप्रधान असलेल्या Rajiv Gandhi यांच्या कार्यकाळात वैज्ञानिक सल्लागार वसंतराव गोवारीकर यांच्या शिफारशीनुसार हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी रूढी-परंपरांपासून सुरक्षित अंतर ठेवून संशोधनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर प्रथम क्रमांक सिद्धांत सतीश शेळके,द्वितीय क्रमांक वरपे ईश्वर राजेंद्र, आंबरे रोशन जालिंदर
तृतीय क्रमांक उदय भाऊराव वामन, अथर्व दत्तू कडलग, निखिल बाबासाहेब चत्तर विजेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरणानंतर आदर्श पिंगळे या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ओझा सर, उपप्राचार्य एस. पी. सुरसे, सुपरवायझर एस. बी. कुटे, प्रा. सुरेश घोरपडे व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रा. अजित गडाख यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. रोझा देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. नितीन नवले, गवारे सर, देशमुख मॅडम, हासे मॅडम, राऊत मॅडम, भारत शिंदे सर आदींचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!