वह्यांच्या अनोख्या भेटीतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचा संदेश ;

मुख्याध्यापक दशरथ विठोबा वर्पे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न”

 

कोळवाडे, ता. संगमनेर :

एस.एम.बी.टी. सेवाभावी ट्रस्ट संचलित जयहिंद आदिवासी आश्रम शाळा, कोळवाडे येथील मुख्याध्यापक दशरथ विठोबा वर्पे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळा रविवारी (दि. ३१ मे २०२६) अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच विधान परिषदेचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून वर्पे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी व उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या प्रसंगी आयकर आयुक्त भारतजी आंधळे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, दुर्गाताई तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, मनीष मालपाणी, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, के. के. थोरात, बाबा खरात, विष्णुपंत राहटळ, किसनभाऊ असे, सरपंच पुष्पाताई गुंजाळ, भाऊसाहेब नवले, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापिका तांबे मॅडम यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्कार समारंभात वर्पे सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत वर्पे सरांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात यश मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक व सहकाऱ्यांनी त्यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.

उत्तरादाखल बोलताना वर्पे सरांनी शाळा, विद्यार्थी, सहकारी शिक्षक व ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध आठवणींना उजाळा दिला. याच वेळी त्यांनी जयहिंद आदिवासी आश्रम शाळेसाठी पाच लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश संचालिका जयश्री थोरात यांच्याकडे सुपूर्द केला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वर्पे सरांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ किंवा शाल न आणता वह्या भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात वह्या भेट दिल्या. या सर्व वह्यांचा उपयोग जयहिंद आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानदानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी, जयहिंद आदिवासी आश्रम शाळा परिवार व समस्त ग्रामस्थ, कोळवाडे यांच्या वतीने करण्यात आले. सेवानिवृत्तीचा हा गौरव सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवण निर्माण करून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!