आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रीची झोप झाली सुखकर.
लोकवेध live न्यूज
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -सचिन लगड
बायफ संस्था संचलित व जनरल मिल्स पुरस्कृत समृद्ध ग्राम प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक विकास उपक्रमांतर्गत मान्हेरे येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचलित आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी बंक बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप मिळावी तसेच पावसाळ्याच्या दिवसात जमिनीखालून येणारा ओलावा अडचणीचा ठरत असतो यावर उपाय म्हणून प्रकल्पाने सुमारे 37 बंक बेड्स मान्हेरे येथील आश्रम शाळेला नुकतेच प्रदान केले आहे.

या बेड्समुळे विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप घेता येते. अभ्यास करण्यासाठीही या सुविधेचा उपयोग होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात विषारी प्राण्यांपासून जमिनीवर झोपल्यानंतर धोका संभवतो. विषारी साप , विंचू , इंगळी , खेकडे , पाली, मुंग्या यांच्यापासून विद्यार्थ्यांना इजा होण्याचा धोका संभवतो. अनेकदा यांचा उपद्रव विद्यार्थ्यांना सहन करावा लागलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यानंतर वर्ग खोल्या ओल्या होतात. चारही बाजूने भिंतीतून ओलावा आल्याने विद्यार्थ्यांना झोपण्याची जागा ओलसर राहते. थंडी आणि पावसाचे वातावरण यामुळे मुलांना व्यवस्थित झोपण्यासाठी जागा उपलब्ध होणे कठीण असायचे. या सर्व बाबींचा अभ्यास करून प्रकल्पाने लहान मुलांना व्यवस्थित झोपता यावे यासाठी ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर मान्हेरे येथील आश्रम शाळेवर राबवली आहे. एकूण 72 विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ होत आहे. विशेष म्हणजे मुलींना प्राधान्य देण्यात आलेले आहे.सुमारे सव्वातीन लाख रुपये गुंतवणूक करून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची झालेली सोय आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेस विषारी प्राण्यांपासून होणारा धोका कमी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. उपक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक पिचड एन. आर. यांनी केले आहे. शाळेवर ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी वाढल्याचे मुख्याध्यापक पिचड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपक्रम राबवण्यासाठी दिलीप भालेराव, जाधव संचिता, बोराडे एस.टी या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. येत्या काळात प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचे प्रतिपादन बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी केले. बायफ संस्थेचे अधिकारी राम कोतवाल , मच्छिंद्र मुंढे , शुभम नवले आदींनी उपक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
