भाविकांच्या सेवेत आमदार खताळ; महाप्रसाद वाटपातून दिला संस्कारांचा संदेश
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सप्ताह भरवू’ : आ. खताळांची मोठी घोषणा
संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अथवा राजकीय कोणताही कार्यक्रम असो, आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती कायमच लक्षवेधी ठरत असते. याच भूमिकेतून त्यांनी शहरालगतच्या गुंजाळवाडी येथे आयोजित स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देत सेवाभावाचे दर्शन घडविले. यावेळी त्यांनी कोणताही राजकीय बडेजाव न दाखवता स्वतः हातात बुंदीचे कॅरेट घेत भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. आमदारांचा हा साधेपणा आणि सेवाभाव उपस्थित भाविकांच्या मनाला भावला.
गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणामध्ये झाली. सप्ताह निमित्ताने तालुक्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत नामस्मरण, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. सप्ताहाच्या समारोपानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वतः आमदार खताळ आणि पत्नी निलम खताळ यांनी महाप्रसाद वाटपामध्ये सहभाग घेत सेवाकार्य केले.राजकीय पदाची कोणतीही दिमाखदारी न दाखवता सर्वसामान्य कार्यकर्त्यां प्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी पुढे सरसावलेल्या आमदार खताळ यांच्या कार्यशैलीचे उपस्थितांनी कौतुक केले.
समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर यांनी संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह सुरू व्हावा, अशी अपेक्षा काल्याच्या कीर्तनातून व्यक्त केली. त्यांच्या या सूचनेचा धागा पकडत आमदार अमोल खताळ यांनी गगनगिरी महाराजांच्या साक्षीने पुढील वर्षापासून संगमनेरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेही सप्ताह सुरू करण्याचा शब्द दिला. त्यांच्या या घोषणेला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
संतांची शिकवण, नामस्मरणाची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा आपल्या समाजजीवनाचा भक्कम पाया आहे. संतांनी दिलेले संस्कार आणि शिवरायांनी दिलेला स्वाभिमान यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. हरिनाम सप्ताहातून अध्यात्माची प्रेरणा मिळते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना राष्ट्रप्रेम, शौर्य आणि कर्तव्याची जाणीव करून देतो. त्यामुळे पुढील वर्षापासून संगमनेरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सप्ताह सुरू करण्याचा शब्द मी गगनगिरी महाराजांच्या साक्षीने देत आहे. हा सप्ताह समाजप्रबोधन आणि युवा पिढीला योग्य दिशा देणारा ठरेल.
अमोल खताळ, (आमदार)
