खिरविरे येथे भाऊराव भोसले यांच्या डांगी वळूला तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप.

 

लोकवेध live न्यूज 
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-सचिन लगड 

 

भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त खिरविरे येथे डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे हे पंधरावे वर्ष असुन ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या यात्रेचे आयोजन खिरविरे ग्रामस्थ व मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यात्रेच्या निमित्ताने या भागाचे वैभव असलेले डांगी प्रजातीचे पशुधन प्रदर्शन बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ यात्रा कमिटी खिरविरे व मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यंदाच्या प्रदर्शनामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील डांगी पैदासकार व पशुधनतज्ञ भाऊसाहेब भोसले यांच्या वळूला चॅम्पियन किताब देण्यात आला.



खिरविरे येथील प्रदर्शनात तिसऱ्यांदा त्यांचा वळू चॅम्पियन ठरला आहे हे मात्र विशेष आहे. पद्मश्री राहीबाई पोपेरे व बायफ संस्थेचे अतिरिक्त राज्य समन्वयक जितिन साठे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक सन्मान चिन्ह व बक्षिसाची 21 हजार रुपये रक्कम प्रदान करण्यात आली. डांगी पशुधन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. डांगी पशुधन या भागाचे खास वैशिष्ट्य असलेले अतिवृष्टी आणि जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात एकमेव तग धरणारे पशुधन आहे. डांगी प्रजातीचे संवर्धन आणि वृद्धी होण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अतिशय कष्टाने आणि मेहनतीने या भागातील शेतकरी डांगी पैदास व संवर्धन करत असतात. त्यांच्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन प्रदर्शनाचे सुंदर पद्धतीने नियोजन करत असतात . या परिसरातील सुमारे 40 ते 50 गावांमधून शेतकरी आपले पाच ते सहा हजार जनावरे प्रदर्शनासाठी घेऊन आले होते. चालू वर्षी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जोडीला 80 ते 90 हजार रुपयापर्यंत बोली लागली. यंदाच्या वर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजक दिनेश शहा यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली . चालू वर्षी प्रदर्शनात जनावरांसाठी जागा व पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डांगी संवर्धन व प्रदर्शन आयोजक गणपत डगळे यांनी दिली. पांडुरंग पराड यांनी चालू वर्षी डांगी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत खिरविरेचे सरपंच गणपत डगळे व सर्व सदस्य , त्रिंबक पराड , प्रकाश पराड , कैलास आवारी , पंढरी बेनके , काळू बेनके, भाऊराव डगळे , रामजी रावते , रामदास धोंगडे, अशोक भांगरे , राजू काळे , भास्कर सदगीर , सुभाष बेनके ,विजय आवारी या मान्यवरांसह ग्रामस्थ शेतकरी, तरूण मित्रमंडळ आदिंनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!