नाचून नाही तर वाचून मोठे व्हा” असा समाजिक एकतेचा संदेश देत गगनगिरी विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
पुस्तके वाचून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासत एकत्रित वाचन करण्यात आले. यासोबतच “नाचून नाही तर वाचून मोठे व्हा” असा समाजिक एकतेचा संदेश देत बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
प.पू गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्र कार्य व शिकवणुकीवर आधारित विद्यार्थ्यांची माहितीपूर्ण भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर वैयक्तिक व सामूहिक गीतेही सादर केली.
माननीय बापूसाहेब देशमुख यांनी सध्याच्या काळातही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व तत्वांची कशी गरज आहे त्याचे प्रतिपादन केले. डॉ. बाबासाहेब यांना कुठल्याही एखाद्या समाजाशी समुदायाशी जोडणे म्हणजे संकुचित पणा ठरतो ते सर्व समाजाचे मार्गदर्शक नेते होते .डॉ. बाबासाहेबांच्या विचारानुसार आचरण करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात राज्यकर्त्यांनी अपेक्षित बदल करावे असे आवाहनही याप्रसंगी बापूसाहेब यांनी केले. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यालयात आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय बापूसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध पुस्तके ठेवण्यात आलेली होती. त्याचबरोबर भारतीय संविधानाची मूळ प्रत तसेच भारतीय संविधानावर आधारित विद्यार्थी व सामान्य नागरिकांना सहज समजेल असे श्री सुभाष वारे लिखित छोटेखाणी पुस्तकांच्या अनेक प्रती ठेवण्यात आल्या होत्या. समाज सुधारक ,क्रांतिकारक ,उद्योगपती शास्त्रज्ञ यांची छोटेखाणी चरित्र या पुस्तक प्रदर्शनात मांडण्यात आले होते. यामध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ,महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे इंदिरा गांधी, सरोजनी नायडू, संत गाडगे महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस ,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ,आईन्स्टाईन ,गॅलेलियो, न्यूटन, रामानुजन, आर्य चाणक्य, सम्राट अशोक अशा अनेक महान व्यक्तींच्या चरित्रांची पुस्तके या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी ठेवण्यात आली होती. तसेच ग्रंथालयातील सर्व कपाटे उघडून विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्याची सुविधा देण्यात आली होती. *आवडीचे पुस्तक घ्या व वाचा* या उपक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.