ज्येष्ठ पत्रकार विनय गुणे यांच्या आठवणीतील पत्रकारिता
लोकवेध live न्यूज
लिहायला सुरवात झाली ती आणीबाणीच्या निमित्ताने..आणीबाणी उठली, जनता राजवट आली, देशभरात खूप उत्साहाचे आणि आशादायी वातावरण होते.. त्या वर्षीच्या ‘ माणूस’ च्या दिवाळी अंकात विनय हर्डीकर यांचा आणीबाणीतील अनुभवावर लेख होता..’ आम्ही आणि बदमाश काळ.’ त्यावर प्रतिक्रिया म्हणून मी आमचेही त्यावेळचे अनुभव लिहिले होते.. ” ‘माणूस’ मधे ते प्रकाशित झाले..त्यावरही प्रतिक्रिया मिळाल्या..आणि माणूस मधील माझं लेखन सुरू झालं.. मग रा. स्व.संघाच्या विचार धन वरील ‘ झोत ‘ या डॉ. रावसाहेब कसबे यांच्या पुस्तकाचे ‘ संदर्भाची मोडतोड ‘ हे परीक्षण लिहिलं होतं.. या पुस्तकावर तेंव्हा भयंकर गदारोळ झाला होता.. त्यामुळे त्यावर खूप उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.. या नंतर आजूबाजूला घडणार्या विविध घटना, प्रसंग, घडामोडी, समाजात दिसणार्या विसंगती, आंदोलने, विधायक उपक्रमांची दखल असं लिहिणे सातत्याने सुरू झालं.. या सगळ्या काळात मी लिहित गेलो..’ माणूस ‘ ने ही ते सातत्याने छापलं.. लिहिण्याचा हुरूप वाढला..
निखिल वागळे यांचे ‘ दिनांक,’ ग वा बेहरे यांचे ‘ सोबत, ‘ साप्ताहिक ‘ विवेक, साप्ताहिक मनोहर,’ शेतकरी संघटनेचे साप्ताहिक ‘ ग्यानबा’ कुमार सप्तर्षी यांचे ‘सत्याग्रही’ यांचेसाठीही लिहिले.. पण खरे सूर जुळले ते फक्त ‘ माणूस’ शीच.. ‘माणूस ‘कडे पाठवलेला कोणताच लेख कधी परत आला नाही किंवा त्यात कधी एका शब्दाचीही काटछाट करावी लागली नाही.. ‘ संगमनेर दंगल.. एक सत्यशोधन, ‘जेंव्हा एक महाविद्यालय विकासाचे केंद्र असते ‘हा कॉलेजच्या विधायक उपक्रमांची दखल घेणारा लेख.. शहराची दोन रूप दाखविणारे हे दोन लेख माणूसच्या अंकाचे प्रमुख विषय झाले.. मुखपृष्ठावरील विषय सूचीत माझ्या लेखांना अनेकदा स्थान मिळाले.. साप्ताहिक ‘ मनोहर’ मधला संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थी आंदोलनावरचा ‘ ज्याने शिकवायचे तोच बिघडतोय,’ साप्ताहिक ‘ विवेक ‘ मधला साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षावरील रिपोर्ट, शेतकरी संघटनेच्या साप्ताहिकातील ‘ शिवसेना किती खरी किती खोटी ‘ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेला लेख, राहुरीच्या कृषी विद्यापीठातील ‘ कुलगुरू हटाव’ आंदोलनाचा रिपोर्ट, पोलीस इन्स्पेक्टर साहेबराव पवार निर्दोष सुटल्यावर त्यांच्या खटल्याचा रिपोर्ट, नगर जिल्ह्यातील पोलीस अत्याचार, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घारगावच्या एका शेतकर्याला कनेक्शनसाठी खूप दमवले होते पण तोही जिद्दी.. त्याच्या वीज मंडळाच्या एकांड्या लढाई वरचा लेख.. नंतर तो ‘बळीराजा’ मासिकाने ही पुन्हा त्यांच्याकडे प्रकाशित केला..,ग्रामीण भागातील शाळेतल्या शिक्षकाची व्यवस्थापनाच्या अन्यायाविरुद्धच्या लढाई वरचा लेख तर त्याला कोर्टाच्या कामात उपयोगी आला होता..
अशा कितीतरी विषयांवर तेंव्हा लिहिले होते.. सगळ्या लिखाणावरच्या प्रतिक्रीया उत्साह वाढविणार्या होत्या..संगमनेर दंगलीवरचा लेख महाराष्ट्रातील दंगलींचा अभ्यास करताना प्रदेश भाजपाने संदर्भ म्हणून विचारात घेतला होता..आणि तत्कालीन डी.आय.जी.अरविंद इनामदार यांनी माझ्याशी चर्चाही केली होती.. तर ‘ग्यानबा’ मधील लेखावर खुद्द ‘ मार्मिक’ चे संपादक आणि सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच दसरा विशेषांकात सडकून टिका केली होती..
हि सगळी साप्ताहिके प्रतिष्ठित होती.. महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या वैचारिक थरात वाचली जात.. माजगावकर, बेहरे हे संपादक पत्रकारितेतील ‘दादा ‘ होते. या सगळ्या साप्ताहिकांचा महाराष्ट्रभर वाचकवर्ग होता, सामाजिक, राजकिय क्षेत्रात दबदबा होता.. यात लिहिणारे सर्वच आपापल्या क्षेत्रातील मोठ नाव असलेले होते.. त्यातल्या लेखांची दखल घेतली जायची.. अती डावे ही नाही, अती उजवे नाही असे उदारमतवादी मध्यममार्गी असे ‘माणूस’ चे स्वरूप होते.. बेहरे सावरकरवादी त्यामुळे ‘सोबत’ हिंदुत्ववादी तर ‘विवेक’ वर संघाचा अधिकृत शिक्काच होता.. ‘दिनांक’ समाजवादी गोतावळ्यात प्रिय होते..
या साप्ताहिकांतील लेखनामुळे अनेक जण ओळखू लागले..’ माणूस’ मधे लिहितो हे तर आदराचे कारण बनले..’ माणूस’ मधे प्रसिद्ध झालेल्या ‘ पूजेतले शंकराचार्य’ या लेखासंदर्भात तर ‘ दिनांक ‘ चे पत्र आले..’ हा लेख आमच्याकडे का नाही..असे लेख आमच्याकडे पाठवत चला..’ पण एक विधायक चळवळीचे व्यासपीठ म्हणून ‘माणूस’ला माझे नेहमीच प्रथम प्राधान्य राहिलं..
आदिवासी अकोले तालुक्यातील शैक्षणिक दुरावस्थेवर माणूस मधे मी एक लेख लिहिला होता.. ‘जिथे शाळा आहे पण विद्यार्थी जातात खेकडे धरायला ‘ या लेखाला ‘ मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘डॉ. ना. भि .परुळेकर’ राज्य पुरस्कार मिळाला होता.. तेंव्हा ‘ नवाकाळ ‘ चे नीलकंठ खाडीलकर हेही पुरस्काराचे मानकरी होते.. मुंबई मराठी पत्रकार संघाचा हा पुरस्कार सन्मानाचा होता..आजच्या सारखे पुरस्कारांचे पेव फुटलेले नव्हते.. त्यामुळे त्याचे कौतुक होते.. तेंव्हा संपादक श्री. ग माजगावकर यांचे अभिनंदनाचे पत्र आले होते..त्यातल्या ‘ तुमच लेखन नेहमीच सकस असतं ‘अशा कौतुकाने शाबासकी मिळाली होती.. एका भेटीत ‘ तुमच्या लेखनाची माणूसच्या वाचकांना खूप सवय झाली आहे ‘ या त्यांच्या प्रतिक्रियेने अधिक अवघडल्यासारखे झाले होते..
दहा पंधरा वर्ष सातत्याने लिहिलं होतं.. पुढं’ माणूस’ बंद झालं.. बेहरे गेले आणि ‘सोबत’ ही बंद झालं.. माणूस, दिनांक, सोबत हि लेखन शैलीला सुयोग्य असणारी साप्ताहिक बंद पडली..त्यामुळे माझं लेखन ही थंडावलं.. झपाटलेला तो काळ ही बदलला.. बदलत्या दिवसात वेगवेगळ्या उपक्रमातील भोटपणाही जाणवू लागला.. सवंगपणा ,भोंदूपणा वाढला..जनता पक्षाची राजवट अंतर्विरोधामुळे अल्प काळातच गडगडली..नवनिर्माणाच्या आशेवर असलेली जनता निराश झाली..लोकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया बोथट झाल्या..चळवळीतली जिगर ही संपली.. आणि ती जागती ठेवणारी ‘माणूस’ सारखी व्यासपीठंही उरली नाहीत.. ती झिंग काही औरच होती.. मात्र त्या दिवसानी खूप समृद्ध केलं..
विनय गुणे , संगमनेर .
