डिग्रस विद्यालयात रंगला सोहळा आषाढी एकादशीचा
विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबतच सण, संस्कृती, परंपरांचे रक्षण करणे व महत्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताचे आहे.
संगमनेर / लोकवेध live न्यूज

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलविते हरीविण ।
देखवी दाखवी एक नारायण
तयाचे भजन चुको नका ।।
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात, शनिवार वार दिनांक 24 जुन 2023 रोजी हरिनामाचा गजर करीत बालदिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सकाळी दिंडीचे प्रस्थान झाले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष महंत उमाजी बाबा पुणेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये होते. टाळ मृदुंग लेझीम झांज पताका सर्व हाती घेऊन विठुरायाच्या नामस्मरणामध्ये दिंडी श्री क्षेत्र सिद्धेश्वर या ठिकाणी प्रथम पोहोचली. सर्व वारकऱ्यांनी रिंगण करून भजनाचा कार्यक्रम केला. त्या ठिकाणी सर्वासाठी मसाला दुधाचे नियोजन लक्ष्मण होडगर, गंगाधर होडगर, व श्रीकृष्ण होडगर यांनी केले.
बालगोपालांसह दिंडीचे प्रस्थान डिग्रस गावामध्ये झाले . त्या ठिकाणी लेझीम झांज पथकाने त्यांची प्रात्यक्षिक दाखवली व या ठिकाणीही सुंदर असं रिंगण करून भजन गवळणी चा कार्यक्रम झाला याप्रसंगी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत बुवाजी बाबा पुणेकर ,सरपंच रंगनाथ बिडगर, ग्रामसेवक मांढरे ,बाळासाहेब
होडगर व सर्व ग्रामस्थ तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक व बहुसंख्य महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस या ठिकाणी गेली आणि पुढे मारुती मंदिरात दर्शन घेऊन त्या ठिकाणी मध्यान भोजन घेतले.शेवटी कानिफनाथ व गुप्तलिंग देवस्थानाचे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप झाला.
टाळ मृदुंगाच्या संगे
गेले वैष्णव रंगूनी
अश्व दौडले रिंगणी
बरसल्या जलधारा अंगणी.
या नेत्रदीपक दिंडी सोहळ्यानंतर डिग्रस गावात वरूण राज्याचे आगमन झाले व त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले.
या दिंडी सोहळ्यासाठी मार्गदर्शन संस्थेचे सचिव जानकीराम बुवाजी पुणेकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग बाचकर यांनी केले.
या दिंडी सोहळ्यातील लेझीम पथकाचे नियोजन शिक्षक मच्छिंद्र खेमनर , श्रीपाद पांढरे व साहेबराव नेहे यांनी केले. भजन, गवळण गायनामध्ये विजय शेंगाळ ,महेंद्र पुणेकर ज्योती चिंधे व मनीषा आचपळे आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिलीप दिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बारकू पुणेकर व किसनाबाई आवळे यांनी परिश्रम घेतले.
