अंजनेरी व ब्रह्मगिरीतील रोपवेचा रोप काढून वृक्षांचे रोप लावा – पर्यावरण प्रेमी
वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन
नाशिक / लोकवेध live न्युज / निलेश शेकोकार
अंजनेरीची जैवविविधता व ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी रोपवेचा रोप काढून वृक्षांचे रोप लावण्यासाठी नाशिक,त्रंबकेश्वर येथील सर्व पर्यावरण संस्थांच्या प्रतिनिधींनी देवशयनी आषाढी एकादशी दिवशी माननीय वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथील पर्णकुटी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अंजनेरी ब्रह्मगिरी पर्वता दरम्यान रोपवेची गरज काय. अंजनेरीची समृद्ध जैवविविधता नष्ट करून जटायूंचा अधिवास संपविणाऱ्या रोपवेला वनविभाग का मान्यता देत आहे असा थेट सवाल पर्यावरण प्रेमींनी वनमंत्र्यांना विचारला असता हे माझ्या अखत्यारीत येत नसून केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे असे सांगून वनमंत्री व राज्य वन्यजीव मंडळाच्या अध्यक्षांनी वन्यजीवांचे व वनांचे संवर्धन करण्यास असमर्थता दर्शविली. 33 कोटी झाडे लावण्याचा संकल्प घेतलेल्या वनमंत्र्यांकडे अंजनेरी ब्रह्मगिरीला न्याय मिळेल अशी अपेक्षा घेवून आलेल्या पर्यावरण प्रेमींचा यामुळे मोठा भ्रमनिरास झाला. वनमंत्र्यांनी नाशिक जिल्याधिकाऱ्यांकडे चेंडू टोलवून पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पर्यावरणप्रेमी,रोपवे बनविणारे यांची नाशिक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. वनविभागच वनांचे संवर्धन करण्यास दुसऱ्यावर अवलंबून असेल तर वनांचे संवर्धन कोणी करावे हा मोठा प्रश्नच पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.पर्यटन विभाग वनविभागाचा पर्यटनासाठी उपयोग करून घेत असतांना रस्ते व वाहतूक विभाग विनापरवानगी शिवाय वनविभागात घुसखोरी करत आहे व वनमंत्री वनांच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चेंडू टोलवीत असतील तर वनविभागाची गरज काय असा प्रश्न वनप्रेमी विचारत आहेत. दुर्मिळ वनस्पतींचे,जटायू सारख्या ऐतिहासिक पक्षांचे रक्षण करणे वनविभागाचे कर्तव्य असून जैवविविधतेने संपन्न वनांचे दरवाजे पर्यटनासाठी बंद करण्याची गरज विदेशातून चित्ते विकत घेण्यातून अधोरेखित होत आहे. रोपवेमुळे अंजनेरी येथील जटायूंचा अधिवास नष्ट झाल्यास देशाचे कधी न भरून निघणारे नुकसान होण्याची भीती पर्यावरण प्रेमींना सतावत आहे.पर्वतमाला योजनेअंतर्गत होणारा रोपवे नाशिक शहरात केल्यास शहरातील वाहतूक समस्यांवर रोपवे उपाययोजना ठरून यातून मोठ्या प्रमाणात शासनास महसूल मिळून पर्यटनास चालना मिळेल असा दावा पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. अंजनेरीची जैवविविधता जपण्यासाठी अंजनेरीच्या अनेक पिढ्यांनी डोंगरावर वस्ती केली नाही,अनेक वनाधिकाऱ्यांनी अंजनेरीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले असतांना रोपवेसाठी अंजनेरी संपविणे पर्यावरण प्रेमींना मान्य होत नाही.यासाठी मोठा लढा उभारण्याशिवाय आता पर्यावरण प्रेमींना दुसरा मार्ग शिल्लक नाही असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. काल वनमंत्र्यांच्या भेटीसाठी डॉ संदीप भानोसे,अरविंद निकुंभ,स्वामी श्रीकंठानंद, नितीन रेवगडे,जयेश पाटील,ललित लोहगावकर,मनीष बाविस्कर,राजेंद्र पवार,सोमनाथ मोरे,विजय मोरे,जयंत दाणी,प्रकाश दिवे आदी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
