कुर्बानीचा नवा अध्याय — बकरी ईद निमित्त ‘आर्थिक कुर्बानी’ व ‘रक्तदान’
गोरेगाव (रायगड) येथील शिक्षक नुरखॉं पठाण यांचा विधायक उपक्रम.
रायगड / लोक वेध live न्यूज /अण्णासाहेब काळे
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण यांनी गुरुवारी (ता. २८) बकरी ईद विधायक पद्धतीने साजरी केली. बकरी ईद निमित्त एखाद्या प्राण्याची कुर्बानी देण्यापेक्षा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आर्थिक कुर्बाणी देत त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच रक्तदान करून बकरी ईद साजरी केली.
त्याच्या या विधायक कार्याला त्यांचे दोन भाऊ इब्राहिम व अल्ताफ यांनी ही साथ दिली असून त्यांनीही नुरखॉं पठाण यांच्या समवेत रक्तदान केले.
बकरी ईद निमित्त नुरखॉं पठाण हे मागील बारा वर्षांपासून आर्थिक कुर्बानी देत आहेत. याद्वारे ते असंख्य विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्य देत असतात. त्यामुळे गोरगरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना शिकणे सुलभ व आनंददायी होत आहे. याशिवाय नुरखॉं पठाण मागील दोन वर्षांपासून बकरी ईदला रक्तदान करत आहेत. आणि त्या आधी देखील विविध दिवशी रक्तदान करत आले आहेत. शिवाय त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात संविधानाचा एक अभ्यासक म्हणून असून ते वर्षाचे ३६५ दिवस संविधान जनजागृतीचे कार्य सोशल मीडियावरिल पोस्ट, पुस्तक व युट्यूबवर व्हिडिओंच्या माध्यमातून करत असतात. तसेच संविधान जनजागृतीसाठी राज्यात विविध ठिकाणी व्याख्यान देखील देतात. “आपले संविधान राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती” नावाने नुरखॉं पठाण यांचे पुस्तक देखील गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले आहे. तेव्हापासून त्या पुस्तकाच्या ८ हजार प्रती संपल्या आहेत. अशाप्रकारे सण हे विधायक मार्गाने साजते करण्याचा संकल्प करून त्याला कृतीची जोड देऊन नुरखॉं पठाण यांनी नवा अध्याय निर्माण केला आहे.
खरं तर अशा प्रकारच्या पब्लिसिटीची परवानगी धार्मिकदृष्ट्या मला नाही. परंतु या माहिती संप्रेषणाच्या जमान्यात बदलता काळ व गरजेनुसार कुर्बानीचा हा नवा अध्याय इतरांनाही अनुकरणीय ठरावा हा उद्देश आहे. आणि म्हणून आज पहिल्यांदा अशा प्रकारची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
नुरखॉं पठाण, गोरेगाव, रायगड
कुर्बानी चा व्यापक अर्थ:-
इस्लाम धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये ‘त्याग’ हे सर्वात महत्वाचे मूल्य आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. तसं बघितलं तर ‘कुर्बाणी’ ह्या संकल्पनेचा खूप व्यापक अर्थ आहे. परंतु कुर्बाणी म्हटलं की, केवळ प्राण्यांचीच कुर्बाणी हाच एक अर्थ घेतला जातो. बदलत्या काळाची गरज म्हणून कुर्बाणी ह्या शब्दाच्या व्यापक अर्थाला प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे. त्यासाठीच गेल्या १२ वर्षांपासून ‘आर्थिक कुर्बाणी’ तसेच गेल्या दोन वर्षांपासून ‘रक्तदान’ दर बकरी ईदच्या निमित्ताने करून ‘कुर्बाणी’ ह्या संकल्पनेच्या व्यापकतेला जगासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
असे नुरखॉं पठाण यांनी लोकवेध live शी बोलतांना सांगितले.
