इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; ८० जणांना बाहेर काढले ; दहा जणांचा मृत्यू
रायगड / लोकवे ध live न्यूज
रायगडमधील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले. ते विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
“या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या परिसरात मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. येथे एकूण 48 कुटुंब येथे आहेत.
सुमारे ८० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही येथील परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत,” असे फडणवीस यांनी सांगितले.
“बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली. मासेमारी करुन नागरिक घरी आले होते. त्यानंतर ही घटना घडली. गिरीश महाजन, दादा भूसे आदी मंत्रीमंडळातील सहकारी त्याठिकाणी पोहचले आहेत. रस्ता नसल्याने त्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मंत्री उदय सामंत, दादा भूसे, याठिकाणी पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.
काल रात्री अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून सर्वत्र चिखल झाला आहे. चिखल तुडवून गावापर्यंत बचावकार्यासाठी जावे लागत आहेत. रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
