इतिहास घडला… चंद्र कवेत आला

लोकवेध live न्यूज

२३ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताचे चांद्रयान-३ मिशन संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँड झालं. चांद्रयान-३ लँड होण्याच्या काही दिवसांआधी रशियाचं लुना-२५ हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं. रशियाची मोहिम अपयशी ठरली. जे रशियाला जमलं नाही ते भारताने करून दाखवल. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली… श्वास रोखले गेले… हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले… आणि बातमी आली… चांद्रयान-३ मोहीम फत्ते झाली… प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले… आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले… “मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे”; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. त्यामुळे हा क्षण फक्त भारताच्याच नाही तर, अखंड जगाच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे.
१४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एक-एक टप्पा पार करत चांद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. चांद्रयान-३ च्या प्रपल्शन मोड्यूलमध्ये शेप नामक उपकरण देखील जोडण्यात आले आहे. शेप म्हणजे स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लेनेटरी अर्थ. हे शेप उपकरण प्रपल्शन मोड्यूलसोबत चंद्राभोवती फिरत राहील आणि इतर दूरच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारा निरिक्षण करेल आणि तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल. इस्रोचा अंदाज आहे की हे उपकरण तीन ते सहा महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. हे शेप उपकरण प्रोपल्शन मॉड्युलमध्ये बसवलेल्या एस बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचविण्याचं काम करेल. चांद्रयान-३च्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात त्याचं संशोधन केलं जाईल. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो.
चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचा फायदा हा केवळ भारतालाच नाही; तर जगातील कित्येक देशांना होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. चांद्रयान-३ हे चंद्रावर विविध गोष्टींचं संशोधन करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याचे अंश मिळतात का याची तपासणी चांद्रयान-३ करेल. आपली सूर्यमाला ही सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती. यावेळी लघुग्रह, उल्काश्म हे सगळ्या ग्रहांवर आणि उपग्रहांवर आदळत होते. यातूनच आपल्या पृथ्वीवर जीवाची उत्पत्ती झाल्याचंही म्हटलं जातं. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या, त्याचे पुरावे चंद्राच्या लपलेल्या भागात असण्याची शक्यता आहे. याचाही शोध चांद्रयान-३ च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या ज्या भागात उतरणार आहे, तो आतापर्यंत मानवापासून लपून राहिला आहे. त्यामुळे या भागातून भारताला जी माहिती मिळेल, ती संपूर्ण जगासाठी नवीन असणार आहे. भविष्यात अंतराळ मोहिमा राबवण्याच्या आणि चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत असणाऱ्या देशांसाठी चांद्रयान-३ ने गोळा केलेली माहिती उपयोगी असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून ‘चांद्रयान-३’च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहिलं. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी इस्रो, टीम चांद्रयान आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होतं. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताला तीन मोठे फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे अंतराळ शर्यतीत भारत खूप पुढे जाईल. दुसरे म्हणजे, इस्रोवरील जगाचा विश्वास वाढेल, त्याचप्रमाणे अवकाश क्षेत्रातील गुंतवणूकही फायदेशीर ठरेल. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची अशी ही गोष्ट. भारतातील १४० कोटी जनतेची मान अभिमानाने वर गेली, ऊर आनंदाने भरून आला. इस्रोचे १६,५०० शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत यशस्वी झाली आहे. प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय, गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा. कारण, भारताच्या चांद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलंय. इस्रोचं यान चंद्राच्या कुशीत शिरलंय आणि महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेलीत. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे.


सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!