संगमनेरात मराठा समाजाचा मोठा जल्लोष…..
पेढे, जिलेबी वाटून, फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळून नाचून केला आनंद साजरा….
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्याने त्यांच्या संघर्षाला यश मिळाले हा आनंद साजरा करत संगमनेर मधील सकल मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून बसस्थानका समोर मराठा क्रांती चौकात पेढे जिलेबी वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून डी जे च्या तालावर नाचून आनंद जल्लोष साजरा केला.
मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंदर्भाने अध्यादेश काढले आहेत. गेले अनेक वर्षे अनेक दिवस आपल्या न्याय हक्काच्या प्रश्नांवर लढणारा मराठा समाज भरडला जात होता. मनोज जरांगे पाटलांच्या मागे संपूर्ण राज्यातील मराठा समाज संपूर्ण ताकदीनिशी एकवटला होता. 20 जानेवारी रोजी मुंबईला लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांचे भगवे वादळ “एक मराठा लाख मराठा” म्हणत मुंबईतील आजाद मैदानावर निघाले होते. दरम्यान वाशीतच सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटीलांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या मान्य करत तसा अध्यादेश दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पीत मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटले. मागण्या मान्य झाल्याने
मराठा बांधवांचा राज्यात सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला.
संगमनेरचे सकल मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला व “जय जिजाऊ जय शिवराय” चा जयघोष करत जल्लोष केला. एकमेकांना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पेढे, जिलेबी वाटण्यात आली.
बस स्थानक परिसरात येत
गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर अबाल वृद्धांसह महिलांनी देखील एकच ठेका धरला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मराठा वीर मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या पुढे देखील संघटित होऊन लढाई लढायला तयार आहोत अश्या
भावना मराठा बांधवांनी व्यक्त केल्या.
