छुप्या पद्धतीने मंत्री विखे पाटील यांच्या बंगल्यावर चकरा मारणाऱ्यांना विखे पाटलांवर टिका करण्याचा नैतिकही अधिकार नाही – अमोल खताळ
संगमनेर, / लोकवेध live न्यूज
शहरातील म्हाळूंगी नदीवरील पुलाचा भूमीपुजन समारंभ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियोजनाप्रमाणे होणार असून कार्यक्रम होत असल्यामुळे विरोधकांना आता त्याचा त्रास होवू लागला आहे. चांगल्या कामात विघ्न आणणाऱ्यांना जनता थारा देणार नाही. छुप्या पद्धतीने मंत्री विखे पाटील यांच्या बंगल्यावर चकरा मारणाऱ्यांना विखे पाटलांवर टिका करण्याचा नैतिकही अधिकार नसल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अमोल खताळ पाटील यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध होत आहे. व्यक्तिगत लाभार्थी योजनेंची प्रभावी अंमलबजावणीही सुरु आहे. यासर्व कामांमुळे शहर आणि तालुक्यातील नागरीक सध्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका घेत आहे. मात्र वर्षानुवर्षे नागरीकांना खोटी आश्वासनं देवून वेठीस धरणारे तालुक्याचे नेते आणि त्यांचे बगलबच्चे आता उघडे पडत आहेत. त्यामुळेच चांगल्या विकास कामात अडथळे निर्माण करुन जतनेची दिशाभूल करण्याचे काम या बगलबच्चांकडून सुरु आहे. मात्र तालुक्यातील सुज्ञ जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असे खताळ यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी होणारे नियोजीत कार्यक्रम ठरल्यानुसार संपन्न होणार असून, म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातूनच निधीची उपलब्धता झाली आहे. मागील २ वर्षे आघाडी सरकार असतानाही या पुलाच्या कामास दमडीचाही निधी उपलब्ध करुन देता आला नाही. उलट पुलाच्या कामासाठी आलेला निधी व्यापारी संकुलासाठी वळविण्याचे पाप कोणी केले हे जनतेला चांगले माहिती आहे. पुल कोणामुळे पडला किंवा कोणी पाडला? याची चर्चा जनतेत आजही घडत आहे. त्यामुळे पुलाच्या कामात अडथळे आणि विघ्न आणणारे कोण आहेत हे जनता जाणून आहे. आता पुलाचे काम मार्गी लागत आहे. याचे शल्य काँग्रेसच्या बगलबच्चांना होत आहे.
भविष्यातही मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामं ही सुरुच राहाणार आहेत. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची तळी उचलायची आणि दुसरीकडे छुप्या पद्धतीने मंत्री विखे पाटील यांच्या बंगल्याकडे जावून फेऱ्या मारणाऱ्यांची विखे पाटलांवर टिका करण्याची नैतिकाही नाही आणि तेवढी तुमची उंचीही नाही. अशा कडक शब्दांत अमोल खताळ पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
