चूलबंद आंदोलन रास्ता रोको: संगमनेरमध्ये आशा सेविका व गटप्रवर्तक आक्रमक; दंडवत आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

आशा सेविका व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी गेल्या ५ दिवसांपासून प्रांत कार्यालयाबाहेर चुलबंद आंदोलन सुरू आहे. महिला कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी आहेत. याकडे प्रशासनाने पाठ फिरवली असून सरकार न्याय देत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. लढा अधिक तीव्र करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी रास्ता रोको व दंडवत आंदोलनाची पोलिसांकडे निवेदनाद्वारे परवानगी मागितली. मात्र, ती नाकारण्यात आली.आशा सेविका व गटप्रवर्तकांवर अन्याय होत असून सरकारने त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला. आशा सेविका व गटप्रवर्तकांना २ हजार रुपये दिवाळी भेट अदा करावी. सेविकांना ७ हजार तर गटप्रवर्तकाच्या मानधनात १० हजार रुपये वाढ करून शासन निर्णय पारित करा. कंत्राटी कर्मचान्याचा दर्जा द्या आदी मागण्यांसाठी ४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ४ महिन्यात मानधनही मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मात्र, सरकारचे आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सरकारच्या आडमुठी धोरणाविरोधात संगमनेर तालुक्यातील ३७० कर्मचाऱ्यांचे ५ दिवसापासून चुलबंद आंदोलन सुरू आहे. प्रशासनातील अधिकारी आंदोलकांकडे कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा सुजाता वाघमारे, सुनीता सांगळे, छाया हर्षदा देवगिरे, सुषमा गुंजाळ, सुरेखा सोनवणे, रिजवाना शेख व कर्मचाऱ्यांनी दिलाआहे. पोलिस प्रशासन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!