संगमनेरात वाहन चालवता मग  कागदपत्र जवळ ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार !
   पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काल सोमवारी वाहतूक पोलिस आणि शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह बस स्थानक परिसरात बेशिस्त वाहनचालक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन चालवताना आवश्यक असणाऱ्या इतर बाबी नसणाऱ्या वाहन चालकावर कारवाईचा बडगा 
 संगमनेर : लोकवेध live न्यूज                                                               
संगमनेरात आता दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, कारण संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी काल सोमवारी वाहतूक पोलिस आणि शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह बस स्थानक परिसरात बेशिस्त वाहनचालक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन चालवताना आवश्यक असणाऱ्या इतर बाबी नसणाऱ्या वाहन चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता संगमनेरात वाहन चालवताना वाहन चालकांना काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी राज संपल्यानंतर शहर पोलीस ठाण्याला भगवान मथुरे नावाचे दबंग पोलीस अधिकारी मिळाले आहेत. त्यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर काल सोमवारी बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवण्यासाठी संगमनेर बस स्थानका नजीक पुणे- नाशिक महामार्गावर वाहतूक आणि शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना घेत स्वतः भगवान मथुरे यांनी अनेक बेशिस्त वाहन चालकांना आपला इंगा दाखवला. यावेळी ड्रायव्हिंग लायसन्स नसणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी,  नंबर प्लेट आणि वाहनाचे कागदपत्रे नसणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. याबाबत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की,
संगमनेर शहरांमध्ये वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे. माझं संगमनेरकरांना एक साधं छोटसं आवाहन आहे की, तुम्ही जेव्हा वाहन चालवायला बसता तेव्हा सुरुवातीला आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही ते बघून घ्या. ड्रायव्हिंग लायसन्स घेऊनच वाहनावर ड्रायव्हिंगसाठी  बसा. यापुढे अचानकपणे कुठल्याही ठिकाणी शहरांमध्ये वाहन तपासणी केली जाईल, त्या वेळेला तुमच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे वाहनाची कागदपत्रे सुद्धा सोबत असणे आवश्यक आहे. अन्यथा वाहन संशयित आहे असं समजून पोलीस ते ताब्यात घेऊ शकतात. तुम्हाला ती कागदपत्रे दाखवणे बंधनकारक राहील. जर ती कागदपत्रे तुमच्याजवळ असतील तर तुमचं वाहन पोलीस परत देतील मात्र कागदपत्रे नसतील तर त्या वाहनाचा अधिकृत मालक जो कोणी असेल त्याची खात्री केल्याशिवाय पोलीस  सहजा सहजी वाहन तुम्हाला परत देऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्याला  कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल म्हणून जनतेने पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील नवनियुक्त पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!