चंदनापुरी येथे उद्यापासून मुळगंगा मातेचा यात्रोत्सव दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
????‍⚖️
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रोत्सवास बुधवार दि. १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवसाला पावणारी श्री मुळगंगा माता अशी ख्याती असलेल्या या देवस्थानच्या ठिकाणी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात बुधवारी सकाळी ८ वाजता होम हवन करून देवीची महाआरती होणार आहे. दिवसभरात देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटी भरण, गुळाची शेरणी असा प्रसाद चढवला जातो. वर्षभरात केलेला नवस फेडण्यासाठी
मोठ्या संख्येने भाविकभक्त येत असतात. रात्री ८ वाजता देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे. सनई चौघडा या पारंपरिक वाद्याच्या पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
यानंतर मारुती मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे. त्यानंतर १० वाजता महाराष्ट्र भूषण, वगसम्राट मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समिती व देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यात्रोत्सव निमित्ताने मुळगंगा मातेच्या मंदिरासह गावातील सर्व मंदिरे व विविध संस्था यांच्यावर देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!