मराठा समाजाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा; लोकवर्गणीतून तरूणांनी दिली एक लाख रूपयाची
देणगी
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
मराठा समाजातील युवकांमध्ये नोकरी, रोजगार, आरक्षणाच्या संदर्भात नाराजी असून गेली अनेक वर्षापासून समाजाची आरक्षणाची मागणी सरकारकडून पूर्ण होत नसल्याने सरकारच्या विरोधात चांगलीच खदखद बाहेर पडत असून ही नाराजी आता कृतीतून व्यक्त करत मराठा समाजाने वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा देत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या प्रतिमेसह एक लाख रुपयांची देणगी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार व उत्कर्षा रूपवते यांच्याकडे सुपूर्द केली. रूपवते यांनी राहात्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या संगमनेर मध्ये येताचक्षणी त्यांचे भव्य दिव्य अशा जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक तरुणाचा जत्था छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून यांनी शक्तीची देवता मारुतीरायाचे दर्शन घेऊन हनुमान जयंती उत्सवानिमित्त भक्तगणांना शुभेच्छा दिल्या. धर्मपीठाच्या मंचावरून मर्मभेदी जयघोष करीत मराठा युवकांनी लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली.
यावेळी दत्ता ढगे, गणेश जोंधळे, विलास वर्पे, दत्ता कराळे, भूषण सहाणे ,मल्हारी राऊत, बाळासाहेब राऊत, राजेंद्र जगताप आदि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करीत “एक मराठा लाख मराठा” या वाक्याने संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे. मराठा असलेल्या मंत्र्याच्या हातात सूत्रे असूनही त्यांना आरक्षणाचा फायदा करून देता आला नाही. अशी शाब्दिक तोफ दत्ता ढगे यांनी डागली. मराठा समाजातील तरुण-तरुणी सुशिक्षित चांगल्या मार्काने पास असूनही रोजगार नोकरी आदिपासून ते वंचित राहिलेले म्हणूनच अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराला बहुआयामी बनवण्यासाठी मराठा समाजाने आता ठाम भूमिका घेत हा उघड पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या युवकासमोर अनेक प्रश्न उभे असून आता येथील युवक जागा झाला आहे. मराठा युवकांमध्ये जनजागृती होत आहे. त्या प्रवाहालाही यामध्ये सामावून घेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवणार असल्याचे दत्ता ढगे यांनी सांगितले. आता गावा गावात तालुक्यात आणि संपूर्ण मतदार संघात बूथ निर्माण करणार असून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून
आता हा हार प्रतिस्पर्धा ची हार ठरवेल अशा त्या म्हणाल्या.
काल राहता येथे उत्कर्षा रूपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी एका भव्य कार्यक्रमात मातंग समाज, धनगर समाज, आदिवासी समाज, मराठा समाजाने, शेतकरी संघटननचे दशरथ सावंत यांनी
जाहीर पाठिंबा दिला असल्याने दिवसागणिक उत्कर्षा रूपवते यांचे पारडे जड होत चालल्याचे निदर्शनास येत आहे. रखरखत्या उन्हात जनसागराच्या अलोट गर्दीत जल्लोषात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हेच यशाचे गमक असल्याचे बोलले जात आहे.
