संगमनेरच्या पहिल्या सायं दैनिकाचा वर्धापन दिन

डॉ. संतोष खेडलेकर

नव्वदच्या दशकातील काळ, टीव्ही पूर्णतः रंगीत झाला होता. नवनवीन वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्या येत होत्या… वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी तर आता पेपर कोण वाचणार असे भाकीत वर्तवित होती. तशी परिस्थिती देशभर तयार झालीच होती. पण संगमनेरातील एक व्यक्ती मात्र भविष्यकाळाचा वेध घेत होती. त्या माणसाला संगमनेर आणि आसपासच्या गावातील लोकांची मानसिकता खुणावत होती. इतरत्र कुठेही टिव्हीमुळे वर्तमानपत्राचा खप कमी होऊ शकेल मात्र संगमनेरला एका आपल्या स्वतःच्या दैनिकाची गरज आहे. यातूनच 1995 साली एका सायं दैनिकाचा जन्म झाला. नाव होतं दैनिक सायं आनंद. आणि संगमनेरकरांना स्थानिक बातम्यांची भूक आहे हे जाणणाऱ्या त्या संपादकांचे नाव होते, राजेंद्रसिंह चौहान उर्फ राजाभाऊ.
1995 ते 2024 असा 29 वर्षांचा दैनिक आनंदचा आणि पर्यायाने राजाभाऊ चौहान यांचा प्रवास म्हणजे आनंद आहे, थरार आहे, वेदना आहे, संकटे आहेत पण दुसरीकडे बातमीशी बांधिलकीही आहे. ज्या काळी संगमनेरला दैनिक आनंद हे वृत्तपत्र सुरू झाले त्यावेळी देशभर वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्या मोठया जोमाने सुरू होत होत्या. मोठ्या भांडवलदार वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्या काढण्यासाठी सर्वार्थाने सक्षम जिल्हे शोधून तिथे आपल्या आवृत्त्या सुरू केल्या होत्या.
खरे तर या बड्या वृत्तपत्रांच्या झंझावातात कुणीही आपल्या गावापुरते, परिसरापूरते वृत्तपत्र काढण्याचा विचारही करू शकत नव्हते पण राजाभाऊंच्या मनात ठाम आत्मविश्वास होता.
आनंद वृत्तपत्र प्रकाशित झाले, संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या बाजारपेठा आणि इतर मुख्य मार्गावरून पेपर वाटणारी मुले फिरू लागली. संध्याकाळी चार ते सहाची वेळ ही बहुतेक ठिकाणी काहीशी निवांतपणाची असते. खेड्यापाड्यातील लोक आपल्या गावी निघालेले असतात आणि शहरातले लोक कामावरून परत येऊन तोवर खरेदीला बाहेर पडलेले नसतात. मोबाईलचे आगमन झालेले नव्हते त्यामुळे सोशल मीडिया नावाची गोष्टही अस्तित्वात नव्हती. या काहीशा रिकाम्या वेळेत नेमके आनंदचे आगमन व्हायचे, अवघ्या एका रुपयात गावाची खबरबात बसल्या जागी मिळायची. लोकही आपण एखादी गोष्ट केली आणि ती बातमीयोग्य असेल तर आनंदला पाठवायचे. राजाभाऊदेखील अशा बातमीमुल्य असलेल्या घटनांना ठळक प्रसिद्धी देऊ लागले….दैनिक आनंदचे गौरव विशेषांक हे तर कुणालाही कौतुक वाटावे असेच असतात. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता राजाभाऊंनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर विशेषांक काढले आहेत. संगमनेरचे एकेक वैशिष्ट्य घेऊन त्यावरही विशेषांक काढले आहेत.कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या संगमनेरकरांवर आठवणीने लेख लिहून त्यांना लोकांपुढे आणले आहे. काही वर्षांपूर्वी राजाभाऊंनी त्यांच्या मनात असलेल्या कर्तृत्ववान लोकांवर दिग्गज लोकांकडून लेख लिहून त्यावर पुस्तक करण्याची कल्पना मांडली होती. त्यावर आम्ही अनेक महिने काम केले. पानिपतकार विश्वास पाटील यांची प्रस्तावना लाभलेल्या ‘ आमचे आनंदयात्री ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही राजाभाऊंनी तितकाच दिमाखदार केला होता. या पुस्तकात जी व्यक्तिचित्र शब्दबद्ध केली गेली आहेत ती सगळी त्या त्या व्यक्तीवर आजवर लिहिलेल्या लेखांमध्ये सर्वोत्तम ठरावी अशीच आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे आनंद खऱ्या अर्थाने लोकांना आनंद देत आहे. संध्याकाळचा पेपर म्हणजे आनंद हे समीकरण तयार झाले. संध्याकाळी चार वाजले की लोकांना आनंदचे वेध लागायला लागले. जोवर आनंद हातात पडत नाही आणि तो वाचून काढीत नाही तोवर लोक बेचैन होऊ लागले. हाच आनंदचा खरा विजय होता. राजाभाऊ चौहान यांच्या दूरदृष्टीचा विजय होता. वाचकांना आपल्या पेपरची वाट बघावी वाटणे हा खऱ्या संपादकांचा सन्मान होता.
राजाभाऊ तसे विविध क्षेत्रात काम करून शेवटी पत्रकारितेत स्थिरावलेल व्यक्तिमत्व. दैनिक रामभूमी, गावकरी, नवाकाळ अशा वर्तमानपत्रात बातमीदारी करता करता वाचकांच मर्म त्यांना चांगलंच कळलं होतं. आनंदच्या वाटचालीत त्यांना या अनुभवाचा चांगलाच फायदा झाला.
आनंद संगमनेरकरांच्या मनात स्थान मिळवीत होता. वाचकांची बातम्यांची भूक भागवित होता, राजाभाऊ वेगवेगळे प्रयोग करीत होते. अशा प्रयोगांपैकी एक म्हणजे ‘ घाव घाली निशाणी ‘ हे सदर. गाव कोणतेही असो, सत्ताधारी कुणीही असो किंवा विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्ते कुणीही असो, लोकांना राजकीय बातम्या आणि त्याही जरा व्यवस्थित समजून सांगितलेल्या असल्या तर मनापासून आवडतात. आनंदच्या रोजच्या अंकात राजकीय घटना घडामोडींवर भाष्य असायचे, विश्लेषण असायचे. वाचकांना हे आवडायचे. या बातम्यांमुळे राजाभाऊंना मोठा त्रासही सहन करावा लागला. पण यातून दैनिक आनंद आणि राजाभाऊ चौहान तावून सुलाखून निघाले.
दैनिक आनंदने वाचकांचे जे प्रेम अनुभवले ते खचितच एखाद्या वृत्तपत्राच्या वाट्याला आले असेल. सकाळपासून आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना घडामोडी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येणाऱ्या पेपरमधून वाचण्याऐवजी त्याच दिवशी संध्याकाळी वाचयाला मिळणे ही वाचकांची गरज होती. ही गरज आनंद आजही पूर्ण करीत आहे. एखाद्या वर्तमानपत्राचे त्या त्या गावाच्या वाटचालीत काय स्थान असते याचे उत्तर शोधायचे झाले तर दैनिक आनंद हे त्याचे सर्वात सुंदर उत्तर आहे. 1995 पासूनच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका किंवा अगदी स्थानिक पातळीवरील सोसायटी, पतसंस्थांच्या निवडणूका असो, गावात घडलेली एखादी सामाजिक, सांस्कृतिक घटना असो, गावपातळीवरील व्यक्तीचे सुयश असो, कुणाचे निधन असो, गावातल्या एखादया नवोदित कवी- लेखकाचे साहित्य असो या सगळ्यांच प्रतिबिंब आनंदने लख्ख आरशात एखादी प्रतिमा दाखवावी तसे दाखवले आहे. या वाटचालीत आज राजाभाऊंच्या सौभाग्यवती सौ. शारदादेवी चौहान या अतिशय खंबीरपणे साथ देत आहेत. केवळ नावापुरते संपादकीय पद न मिरवता त्या संपूर्ण अंकाची मांडणी करतात. बातम्या लिहितात, टाईप करतात, त्या बातमीला योग्य स्थान देऊन ती सुयोग्यपणे मांडतात. काही अपरिहार्य कारणांनी राजभाऊंच्या अनुपस्थित त्यांनी एकटीने अनेक अंक काढले आहेत. इंग्रजीत ‘ मेड फॉर इच ऑदर ‘ असे एक संबोधन आहे हे या दांम्पत्याला खऱ्या अर्थाने लागू होते.
महाराष्ट्रातील खूप थोड्या तालुक्यांच्या गावी सायं दैनिके प्रकाशित होतात. त्यातही काही सन्माननीय अपवाद वगळता बातमीही प्रामाणिक किती हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. अशा काळात दैनिक आनंद आपले ‘ स्वत्व ‘ टिकवून वाचकांची बातमीची भूक भागवित आहे. आता आनंद डिजिटल स्वरूपातही प्रकाशित होतोय त्यामुळे संगमनेरशी नाळ असलेले जगभरातील वाचक स्वतःला गावाशी कनेक्ट ठेवण्यासाठी आवर्जून आनंद वाचतात.
मित्रवर्य राजाभाऊंना यानिमित्ताने शुभेच्छा देताना, त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करताना मनापासून सांगावे वाटते की, राजाभाऊ तुम्ही, माननीय भाभी आणि दैनिक आनंद आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहात… तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो याच दैनिक सायं आनंदला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्र दिनाच्याही मनापासून शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!