साकूर येथील बहुचर्चित अनधिकृत इमारतीवर अखेर फिरणार बुलडोझर

सदर अवैध इमारत भुईसपाट होणार असल्याने अवैध बांधकामाला चाप लागणार आहे.

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

 

साकूर गाव हे संगमनेर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. यातच गावातील मोक्याच्या ठिकाणी आक्रमणे झाली आहे. अशाच एकाने शासकीय जमीनीवर एका बिल्डरने अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते बुवाजी पाटील खेमनर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सामाजिक कार्यकर्ते तथा पठार भागातील भाजपाचे वरीष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनर यांनी शासन दरबारी अवैध इमारतीचे बांधकामातील भ्रष्टाचार कागदोपत्री सादर केला होता. संबंधित कागदपत्रे माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून बिल्डरचा काळा कारनामा आता उघड झाला आहे. बुवाजी खेमनर यांनी शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी बिल्डरसह त्याला मदत करणाऱ्यांवर देखील फौजदारी कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

संगमनेर तहसीलदार धिरज मांजरे यांनी या अवैध इमारती बाबत निकाल दिला आहे. या निकालात संगमनेर तहसीलदार यांनी कब्जेदार यांना तीस दिवसात आपल्या स्व:इच्छेने अतिक्रमण काढाण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या इमारतीतील गाळाधारक व रहिवासी अडचणीत आले आहेत. या इमारतीतील बांधकामाला परवानगी नसताना या गाळ्यांची व निवासी फ्लॅट ची खरेदीखत कसे झाले. याची देखील चौकशी होणार असल्याची माहिती बुवाजी खेमनर यांनी दिली आहे.

या दाव्याचे अर्जदार बुवाजी खेमनर यांनी दि.०२/०२/२०२२ रोजी अर्ज केला होता, हिरेवाडी गावापासुन दक्षिणेकडील मुळा नदी पर्यंत वाहणाऱ्या शासनाच्या मालकीच्या ओढयाच्या भागात इमारत बांधकाम करुन अतिक्रमणे केली आहेत, ही अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी केली होती. सरकारी ओढयाच्या भागात साकुर गावालगत व साकुर गावचे हद्दीत साकुर चौफुलीच्या दक्षिणेकडील ओढयाच्या भागात केलेली बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची विनंती केली होती. साकुर ग्रामपंचायतीने अशा ओढयाच्या भागात गावातील केरकचरा आणून टाकु नये व नैसर्गीक प्रवाह बंद करु नये असा आदेश पारीत व्हावा असा अर्ज दाखल होता

खेमनर यांनी अर्जात म्हटले की नैसर्गिक नाले, ओढे यांची मालकी सरकारकडे असते व त्यांचे जतन, संरक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी तेथील स्थानिक प्रशासनाकडे असते. परंतु कुंपनानेच शेत खाल्ले असा गंभीर आरोप यावेळी बुवाजी खेमनर यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे.

यावेळी निकालात म्हटले आहे की अतिक्रमणधारक अश्पाक इब्राहिम पटेल, जाकीर अमिनभाई मोमीन, जावेद अमिनभाई शेख यांनी सबब महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम २०,५० व ५३ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक रचना आधिनीयम १९६६ चे कलम ४५ व ५३ मधील तरतुदी विचारात घेता साकूर ता. संगमनेर ग.नं. ४६४ मधील सरकारी ओढयावर बेकायदेशीर पूर्वपरवानगी शिवाय अतिक्रमण काढून घेणे आवश्यक आहे.

भूमी अभिलेख यांचेकडील पत्र क्रं. ३३४/२०२४ दि.१७/०१/२०२४ नुसार मोजणी शिटनुसार सरकारी ओढयामध्ये इमारत बांधकाम करुन केलेले अतिक्रमण स्वतःहुन अतिक्रमण धारकांनी ३० दिवसांत काढुन घ्यावे.

अतिक्रमण धारक यांनी ३० दिवसांत अतिक्रमण न काढलेस सर्व हितसंबंधितांना नोटीसा देवुन तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांनी अतिक्रमण काढावे असे निकालात म्हटले आहे. तर अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्च अतिक्रमण धारक यांचेकडुन वसुल करुन घ्यावा. असं तहसीलदार संगमनेर यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे. याकामी अर्जदार बुवाजी पाटील खेमनर यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ ऍड. श्रीराम गणपुले व ऍड. गुंड यांनी काम पाहिले. या निकालावरुन साकूर गावात अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे.

अकृषक तसेच निवासी इमारत दाखवून व्यावसायिक गाळे बांधण्यात आले..यात शासनाची देखील मोठी दिशाभूल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात स्थानिक प्रशासनाने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याने त्यांच्याबाबत काय चौकशी केली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या अवैध इमारतीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात कुणा कुणाचे हात बरबटलेले आहे याची देखील चौकशी लावणार असल्याची माहिती बुवाजी खेमनर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!