मंकावती देवी नारळी सप्ताहाची भक्तिमय सांगता; पंचक्रोशीतून भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
नेवासा (माका) प्रतिनिधी : दत्तात्रय शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या नेवासा तालुक्यातील माका गावातील ग्रामदैवत मंकावती देवीच्या पावनभूमीत आयोजित दुसऱ्या नारळी सप्ताहाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली.
बीड जिल्ह्यातील रेंगावर येथील महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. दि. १ मे रोजी पंचक्रोशीतून आलेल्या असंख्य भाविक भक्त, संत-महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काला कीर्तनाच्या स्वरूपात सप्ताहाची सांगता झाली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
यावेळी महंत सुरेशानंदजी महाराज यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना प्रबोधन करताना सांगितले की, “जीवनात परमार्थाचा मार्ग स्वीकारून संतांची सेवा केल्यास काहीच कमी पडत नाही.” त्यांच्या या विचारांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
सप्ताहादरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली. तसेच भाविकांसाठी दिवसरात्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे सप्ताह विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीसह इतर तालुके व जिल्ह्यांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास खा. रामराव वडूकुते, आ. सुरेश आण्णा धस, आ. विठ्ठलराव लंघे, नगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, अमोल गाडे, अभय आठवले, भैय्या साहेब धस, नवनाथ पडळकर, भारत शिंगाडे, कोळेकर साहेब, डॉ. स्नेहलता सोनटक्के, चितळकर साहेब, नरोटे साहेब, रामहरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माका ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
