संतांच्या समतेच्या परंपरेचा काँग्रेसचा विचार – आमदार थोरात

युवक काँग्रेस मधून तरुणांना मोठी संधी

शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

संत साहित्य ते आधुनिक राजकारणाचा आ.थोरात यांनी उलगडला प्रवास

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

वर्णव्यवस्थेमुळे समाज जाती व्यवस्थेत विभागला गेला होता. मात्र या सर्वांना मानवता या धर्मातून एकत्र आणण्याचे काम संतांच्या समानतेच्या विचारांनी केले. समतेच्या विचारांची हीच परंपरा घेऊन काँग्रेस पक्ष काम करत असून युवक काँग्रेस या व्यासपीठावरून तरुणांना समाजकारण राजकारणासह सर्व क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी संत साहित्य ते आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारणातील सर्व पक्षांचा  प्रवास तरुणांपुढे  उलगडला.

सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या प्रांगणात शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुभाष सांगळे, सचिन खेमनर, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा ,ॲड नानासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष गोरख घुगे, हर्षल राहणे,अमित गुंजाळ, वैष्णव मुर्तडक, गोपी जाहगीरदार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे आणि समानतेची समृद्ध परंपरा निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. हाच सर्वधर्मसमभावाचा विचार काँग्रेस पक्षाने जोपासला आहे. मानवता धर्माची परंपरा सांगणारे आपण काँग्रेसवाले आहोत. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले पाहिजे. मात्र 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली आहे.वैचारिक अधिष्ठान बाजूला ठेवून सुडाचे, धर्माचे, जातीभेदाचे राजकारण सुरू झाले हे अत्यंत चिंताजनक आहे. वैचारिक दर्जा घसरला आहे. अनेक जण उथळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असतात.इडी,सीबीआय,पत्रकारिता, न्यायालय यासारख्या स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे.मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तींना तुरुंगात घातले जात आहे.

आता भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. असे सांगताना तरुणांनी स्वतःचे कुटुंब व्यवसाय सांभाळून राजकारण व समाजकारणात सहभाग घ्यावा. चांगल्या व्यक्तींची राजकारणात गरज असून युवक काँग्रेसमुळे अनेकांना संधी मिळत आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा, संस्कृतीक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून मिळणारे व्यासपीठ हे तुमच्या करिअरला दिशा देणारे ठरणारे आहे. युवकांनी इतरांशी संवाद साधा .सकारात्मक वाचन करा. चांगल्या लोकांशी मैत्री करा असे सांगताना देश हिताचा काँग्रेसचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाला त्यागाची आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. महिलांच्या प्रगतीत आणि आरक्षणांमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. तरुणांनी समाजाच्या प्रगतीसाठी युवा काँग्रेसमध्ये काम करताना गटातटाचे राजकारण करू नका. प्रत्येकाने माणसे जोडायचे आहेत. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाचे काम होत असून युवक काँग्रेसचा संगमनेर पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरावा यासाठी युवकांनी संघटित होऊन जास्तीत जास्त चांगले काम करावे असे आवाहन केले. यावेळी मिलिंद कानवडे, ओंकार बिडवे, योगेश खेमनर, रुपेश राहणे,आशिष वर्पे, स्वाती राऊत, प्राजक्ता घुले, विजय उदावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शहर व ग्रामीण युवक काँग्रेस मधील कार्याध्यक्ष महासचिव सरचिटणीस यांचा विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला.या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील युवक व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाचा संगमनेर पॅटर्न

संगमनेर तालुक्यातील सहकार,राजकारण, समाजकारण,शेती व्यवसाय, दूध व्यवसाय, शिक्षण, समृद्ध बाजारपेठ, सर्वधर्मसमभावाचे वातावरण, विकासाचे राजकारण हे सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. राज्यातील पहिल्या मोजक्या तीन चार तालुक्यांमध्ये संगमनेरचा उल्लेख होत असून ही गौरवशाली परंपरा जपण्याचे काम तरुणांना करायचे आहे.तरुण पिढी ही पुढील पन्नास वर्षाचे भविष्य असून अडथळे निर्माण करणारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवणाऱ्यांना सर्वांनी वेळीच दूर करावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!