वंदना सोनार यांना विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान

इगतपुरी / लोकवेध live न्यूज 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी केंद्र काळुस्ते येथे कार्यरत उपक्रमशील शिक्षिका वंदना सोनार यांना महाराष्ट्र शासनाच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते नुकताच विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील दरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोनार यांच्या मार्गदर्शनाने जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उत्तम सुयश मिळविले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनार सातत्याने शाळास्तरावर नवनवीन नवोपक्रम राबवीत असतात.‌ चालू शैक्षणिक वर्षात त्यांनी सलग आठ महिने दरेवाडी शाळेला स्टार टिचर पुरस्कार व तीन वेळा पोस्ट ऑफ द मंथ किताब मिळवून दिला. या उत्कृष्ट यशाबद्दल नाशिक जिल्हा टीम विनोबाकडून दरेवाडी शाळेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, कोटक महिंद्रा उद्योग समूहाचे समन्वयक प्रेमकुमार, विनोबा भावे कार्यक्रमाचे विश्वजित पवार, राम काळे, कृष्णा घायाळ, राकेश महाजन व नाशिक जिल्हा विनोबा टीमचे सदस्य उपस्थित होते.‌ या यशाबद्दल दरेवाडी शाळेचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सोनवणे व केंद्रप्रमुख विजय पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!