शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न आमदार थोरात यांनी सरकारला घेरले
कनेक्शन कट न करता पूर्ण दाबाने दिवसा विज द्या
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राज्यातील संपूर्ण शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अशा कठीण परिस्थितीतही तो पीक घेण्याचे धाडस करतो आहे. मात्र रात्री – अपरात्री व अपूर्ण दाबाने मिळणारी वीज यामुळे शेतकरी मोठा संकटात असून सरकारने कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट न करता दिवसभर पूर्ण दाबाने वीज द्यावी अशी मागणी माजी कृषीमंत्री व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
याचबरोबर सह्याद्रीच्या पायथ्याला रात्री अपरात्री बिबट्यांचा मोठा संचार असून शेतीला पाणी द्यायचे असेल तर मोठी भीती असते. त्यामुळे सरकारने दिवसभर वीज पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. याचबरोबर अशा कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा देताना कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, कांदा पिकाला पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान, आदिवासी शाळांना शंभर टक्के अनुदान, यांसह विविध प्रश्नांवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाला घेरले आहे.
दिवसभर पूर्ण दाबाने विज द्यावी व कुणाचीही वीज कनेक्शन कट करू नये या आमदार थोरात यांच्या मागणीमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
