मालदाड येथे वृक्षसंवर्धनासाठी शेततळ्याचे उद्घाटन –

विविध १०,५०० वृक्षांची लागवड

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

आज संगमनेर तालुक्यातील मालदाड गावात पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या शेततळ्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हे शेततळे डॉर्फ केटल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दायित्व निधीतून, तसेच सप्रेम संस्था, नवदृष्टी संस्था व ग्रामपंचायत मालदाड यांच्या संयुक्त सहकार्याने साकारण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळा सप्रेम संस्थेचे प्रकल्प समन्वयक हिमांशू लोकरे, सरपंच गोरक्ष नवले, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरणपूरक या उपक्रमास भरभरून पाठिंबा दर्शविला.

विशेष बाब म्हणजे, मालदाड येथील गट नंबर ५२२ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी शेवगा – ४,०००, आंबा – २,०००, आवळा – ३००, चिंच – १,०००, जांभूळ – २००, मोह – १००, सीताफळ – ५००, साग – ५० आणि इतर ३५० अशा एकूण १०,५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

हे शेततळे प्रामुख्याने डॉर्फ कॅटल केमिकल्स मॅंगो कप अंतर्गत वृक्षलागवडीसाठी व झाडांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आले असून, यामुळे स्थानिक जैवविविधता व पर्यावरण समतोल राखण्यास मोठा हातभार लागणार आहे.

हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित न राहता, वृक्षांचे संगोपन व दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा ठरत आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून भविष्यातही असेच उपक्रम राबविण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!