रताळ्यात दिसला गणपती! – संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाल्यात श्रद्धेचा चमत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला या छोट्याशा गावात घडलेली एक आगळीवेगळी घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. येथील शेतकरी बजरंग जगन्नाथ कवडे यांच्या शेतात रताळं उपसताना त्यात गणपतीसारखा आकार असलेलं एक रताळं आढळून आलं.
या घटनेचं विशेष असं की, कवडे कुटुंबातील सुनबाई प्रणिता सचिन कवडे यांनी मागील वर्षी हरितालिका पूजनाचं निर्माल्य आपल्या शेतात गाडलं होतं. त्या निर्माल्यातील रताळ्याचा एक लहानसा तुकडा काही दिवसांनी अंकुरून वाढू लागला आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या रताळ्यात झालं. यावर्षी एकादशीच्या दिवशी रताळं काढताना या रताळ्यात स्पष्टपणे गणपतीसारखा आकार दिसून आला.
ही बाब लक्षात येताच कवडे कुटुंबाने तो रताळा घरी आणला, त्याची गणपती म्हणून आरती केली आणि पूजन करून त्याला आपल्या घरातील एक पवित्र स्थानी स्थान दिलं आहे.
कवडे कुटुंब व गावकरी याला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानतात. “हे आम्हाला गणरायाचं आशीर्वादचं रूप वाटतं. यामुळं आम्ही अत्यंत आनंदित आहोत,” असं कवडे कुटुंब सांगतं.
