पिंपरणे गावात विविध तणांवर तणनाशकाची प्रभावी फवारणी — सरपंच नारायण मरभळ यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना दिलासा
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात सध्या काँग्रेस गवतासह विविध प्रकारचे तण मोठ्या प्रमाणावर वाढले होते, त्यामुळे गावाचा परिसर अस्ताव्यस्त झाला होता. या तणांमुळे मच्छर, विषारी कीटक व प्राणी वाढून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी गावकऱ्यांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत होते आणि वातावरणात भीती निर्माण झाली होती.
ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ यांनी तात्काळ पुढाकार घेतला आणि तणनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार दिनांक 15 रोजी सकाळी सरपंच मरभळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात तणनाशक फवारणी सुरू करण्यात आली.
फवारणीच्या या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य उत्तम राहींज, निलेश बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला. तर फवारणीचे काम रितेश साळवे व भैय्या साळवे यांनी केले फवारणी कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई प्रदीप मांडे हे स्वतः उपस्थित राहिले.
गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, अमरधाम तसेच जिल्हा परिषद शाळेजवळ व अंगणवाड्यांभोवती फवारणी करण्यात आली. फवारणीनंतर गावात स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल जाणवू लागले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या प्रभावी आणि वेळेवर झालेल्या कारवाईबद्दल सरपंच नारायण मरभळ आणि ग्रामपंचायत टीमचे गावकऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. पिंपरणे ग्रामपंचायतने यानंतरही नियमित फवारणी व स्वच्छतेचे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
