शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जवळे बाळेश्वर येथे ५० केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण : ग्रामीण सहभागातून हरित उपक्रम.
घारगाव / लोकवेध live न्यूज / नवनाथ गाडेकर
संगमनेर तालुक्यातील निसर्गरम्य कवठेवाडी परिसरात वसलेल्या बाळेश्वर मंदिराजवळील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जवळे बाळेश्वर येथे केशर आंब्याच्या ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आदिवासी मुला-मुलींसाठी मोफत निवासी शिक्षण देणारी ही शाळा गावकऱ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांत अग्रभागी राहत आहे.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री. अजय बांबळे आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव श्री. अनिल कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी सौजन्यपूर्वक शाळेस ५० केशर आंबा रोपे उपलब्ध करून दिली. याआधी देखील शाळेच्या परिसरात केशर आंब्याची एक बाग यशस्वीपणे उभारण्यात आली आहे, तसेच प्रायोगिक तत्त्वावर सफरचंदाचे झाडही येथे लावण्यात आले आहे.
या वृक्षारोपण उपक्रमाची देखभाल आणि निगा राखण्याचे कार्य माजी मुख्याध्यापक श्री. सुरेश राठोड सर, विद्यमान मुख्याध्यापक श्री. मोबीन मणियार सर, अधीक्षक श्री. दीपक गुंडेकर सर, शिक्षक वृंद, वर्ग चार कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागातून पार पाडले जात आहे.
या उपक्रमास माननीय प्रकल्प अधिकारी सौ. देवकन्या बोकडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. मनोज पैठणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेच्या हरित वाटचालीला गावकऱ्यांची साथ लाभत असल्याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
शिक्षण, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम साधणाऱ्या या आश्रम शाळेचा हिरवळीकडे वाटचाल करणारा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी अनुकरणीय ठरेल!
