आदिवासी महिलांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय महिला दिन.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे या होत्या

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी(सचिन लगड) लोकवेध live न्यूज 

 

ए. एस. के फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संस्था नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत चिचोंडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहीबाई पोपेरे या होत्या . व्यासपीठावर मराठी भाषा तज्ञ डॉक्टर रंजना कदम,अन्नमाता ममताबाई भांगरे ,परसबागेची आई शांताबाई धांडे ,प्राध्यापिका अर्चना बच्छाव ,विभाग प्रमुख जितीन साठे , सरपंच कविता मधे व विमल पदमेरे , आदर्श महिला शेतकरी विमल बाळू घोडे हे मान्यवर उपस्थित होते. आदिवासी भागातील महिला मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. महिलांचे संघटन व त्यांचे सक्षमीकरण यावर विशेष भर प्रकल्पांतर्गत देण्यात येतो. प्रकल्पातून दिली जाणारी मदत महिला बचत गटांच्या माध्यमातून दिली जाते.



याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर रंजना कदम यांनी महिला संघटित होऊन ग्रामीण भागातील महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकतात त्यासाठी महिलांनी संघटित होऊन गावातील प्रमुख प्रश्न ग्रामसभेच्या माध्यमातून पटलावर आणणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. अन्याय सहन न करता ग्राम विकासाच्या प्रक्रिया सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. अन्नमाता ममताबाई भांगरे यांनी कमी खर्चात सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. बायफ च्या माध्यमाने केलेले शेतीविषयक प्रयोग मला सर्वांपर्यंत पोहोचऊ शकले .आपण करत असलेले काम प्रामाणिकपणे केल्यास जीवनात यशस्वी होतो असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी केलेला पहिला विमान प्रवास व त्यातील गमती जमती उपस्थित महिलांना सांगितल्या. या गमती जमती ऐकताना महिलांमध्ये एकच हाशा पिकला. बायफ विभाग प्रमुख जितीन साठे यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी महिलांचे संघटन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. आप आपसातील हेवेदावे दूर करून ग्रामविकासासाठी महिलांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. पिण्याचे पाणी, महिलांचे आरोग्य , शाळा व शैक्षणिक दर्जा , रस्ते , बीज , रोजगार , शेती इत्यादी विविध विषयात ग्राम पातळीवर असलेल्या अडचणी व समस्या दूर करण्याचे माध्यम ग्रामसभा असल्याचे त्यांनी नमूद केले ग्रामसभेला महिलांची उपस्थिती अत्यंत कमी असते त्यामुळे महिलांचे प्रश्न पटलावर येतच नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


महिलांना मार्गदर्शन करताना पद्मश्री राहीबाई पोपेरे

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी महिला शक्ती एकत्र आल्यास कुठल्याही समस्या दूर करता येणे शक्य आहे हे स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. नुकतेच त्यांनी गावातील अनेक वर्षापासून सुरू असलेले अवैध दारू धंदे कसे बंद पाडले याचे उदाहरण सर्वांना दिले. दारू आणि जुगार अड्डे उध्वस्त करण्यासाठी स्रीशक्ती कामी आल्याचे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून उपस्थित महिलांना सांगितले. गावातील प्रमुख समस्या दूर करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. महिलांच्या पुढाकाराने गावातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले. मेळाव्यासाठी परिसरातील बारी , जहागीरदारवाडी ,चीचोंडी , पेंडशेत , पांजरे , मुरशेत या गावातील सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बायफ संस्थेचे कर्मचारी विष्णू चोखंडे , योगेश नवले , किरण आव्हाड , गोरख देशमुख , वर्षा भागडे ,मच्छिंद्र मुंढे , सुनील बिन्नर , राम कोतवाल, शुभम नवले ,सुनिता मुंढे ,यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते श्रावण उघडे , सुनील मधे ,परशुराम पदमेरे ,प्रदीप बांगर , त्रिंबक खाडे यांनी विशेष मेहनत घेतली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले तर आभार गोरक्ष देशमुख यांनी मांनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!