मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून साकारलेले हिरवे स्वप्न – पिंपरणे शाळेत उल्लेखनीय वृक्षारोपण उपक्रम!
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. या संपूर्ण वृक्षारोपण उपक्रमामागे शाळेचे कार्यकर्तृत्वशील मुख्याध्यापक श्री. संजय उत्तम बोर्से सर यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पना व नेतृत्व हे खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी होते.
मुख्याध्यापक बोर्से सर यांनी “शाळा परिसरात फक्त शिक्षणच नव्हे तर निसर्गप्रेमही रुजले पाहिजे” या भावनेतून वृक्षारोपणाचा विचार मांडला. त्यांच्या या कल्पनेला शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंदांनी मन:पूर्वक प्रतिसाद दिला. समितीतील प्रत्येक सदस्य आणि शिक्षकांनी प्रतीजण १००० रुपये अशी स्वेच्छा वर्गणी जमा करून एकूण ८ झाडांची रोपे विकत घेण्यात आली. यात टर्मिनिया प्रवर्गातील २० फूट उंचीची ४ झाडे व १० ते १२ फूट उंचीच्या बकुळ जातीच्या ४ झाडांचा समावेश आहे.
या वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या खड्ड्यांची खोदाई, खत व्यवस्थापन, रोपे लावणे अशा सर्व जबाबदाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. गणेश राहिंज व श्री. अरुण वर्पे यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सहकार्यामुळेच संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीप अशोक ठोंबरे, सदस्य श्री. मिनिनाथ जोर्वेकर सर, श्री. बाबासाहेब राहिंज सर आणि इतर सदस्यांनीही उपक्रमात मोलाचे योगदान दिले. वृक्षारोपण करताना विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपे लावून त्यांना निसर्गसंवेदनशीलतेचा अनुभव देण्यात आला.
मुख्याध्यापक बोर्से सरांच्या पुढाकारामुळे साकारलेला हा हिरवा उपक्रम संपूर्ण पिंपरणे परिसरात एक प्रेरणास्थान ठरत आहे. शिक्षणासोबतच पर्यावरणाची जपणूक कशी करावी याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
.
