आमदार अमोल खताळ यांचा ‘फुगडी’तून भक्तिभावाला सलाम! मनोलीच्या हरिनाम सप्ताहात भाविकांमध्ये मिसळले
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील मनोली गावात सुरू असलेल्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात यंदा एक वेगळीच भक्तिभावाची झलक पाहायला मिळाली. राजकीय पद भूषवणारे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी भाविकांमध्ये मिसळत, लहानग्यांबरोबर पारंपरिक फुगडी खेळत भक्तीचा अनोखा अनुभव घेतला.
गावातील विविध वयोगटातील महिला, पुरुष, मुले-मुली, आणि वारकरी मंडळी हरिनामाच्या गजरात रंगली असताना आमदार खताळ यांनी देखील त्यांच्या सोबतीने फुगडी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या क्षणांनी संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने भारून गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान सप्ताह समितीचे अध्यक्ष देविदास शिंदे होते. त्यांनी आमदार खताळ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले,
“माझ्या कुटुंबाला धार्मिकतेचा आणि वारकरी परंपरेचा वारसा लाभला आहे. माझी आई दरवर्षी पंढरपूर वारी करते. तिथे मिळणारी सकारात्मक ऊर्जा इथेही या हरिनाम सप्ताहात अनुभवायला मिळते.”
कार्यक्रमास भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, किसन शिंदे, रुपम गाडेकर, मछिंद्र भागवत, काशिनाथ साबळे, सोन्याबापू ठोसर, बाबासाहेब ठोसर, संदीप बेंद्रे, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, अप्पा बेंद्रे यांच्यासह मनोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भक्तिमय सप्ताहात हरिनामाचा गजर, प्रेमभाव, आणि लोकप्रतिनिधींची अशी आत्मीयता यामुळे मनोली गावात भक्ती, संस्कृति आणि एकतेचं दर्शन घडले. ही अनुभूती गावकऱ्यांच्या मनात कायमची घर करून गेली
