श्रावणात श्रद्धेचा साज – निझरणेश्वराच्या चरणी चेअरमन रणजितसिंह देशमुख सपत्नीक नतमस्तक

निझरणेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सन्मान ; श्रावण सोमवारला भक्तांचा ओसंडून प्रतिसाद

 संगमनेर / लोकवेध live न्यूज

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त संगमनेर तालुक्यातील प्राचीन व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र निझरणेश्वर मंदिरात राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी शरयुताई देशमुख यांनी सपत्नीक हजेरी लावत विधीवत पूजा-अर्चा केली.
या भक्तीमय सोहळ्याचे औचित्य साधत निझरणेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या पावन प्रसंगी मंदिर परिसर भक्तांनी ओसंडून भरला होता. श्रावण सोमवार असल्याने पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. देशमुख दाम्पत्याने अत्यंत विनम्रपणे दर्शन घेत तालुक्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी, आरोग्य व एकात्मतेची प्रार्थना केली.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले,
“श्री निझरणेश्वर हे आमच्या श्रद्धेचे केंद्र आहे. इथे येताच मन शांत होतं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहोचावी, हा आमचा संकल्प आहे. भोलेनाथाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, संपूर्ण संगमनेर तालुका समृद्ध, सुशिक्षित व सशक्त व्हावा.”

शरयताई देशमुख यांनी सांगितले,
“स्त्रीशक्ती ही परिवर्तनाची खरी प्रेरणा आहे. निझरणेश्वराच्या सान्निध्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा घेता येते.”

या सोहळ्यात निझरणेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बबन पवार, सचिव गंगाधर वायकर, तसेच विश्वस्त दिलीप जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, किशोर जोंधळे आणि शिवाजी जोंधळे यांनी देशमुख दाम्पत्याचा अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार केला.

ट्रस्टच्या वतीने झालेल्या या सत्काराने उपस्थित भाविकांमध्ये समाधान व अभिमानाचे वातावरण होते.

मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने नटला होता. रांगोळ्यांचे मनोहारी नमुने, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसरात भक्तिभावाने भारलेली ऊर्जा अनुभवता आली.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री निझरणेश्वर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होत असून, देशमुख दाम्पत्याच्या दर्शनामुळे या सोमवारी श्रद्धेचा आणि सेवाभावाचा संगम घडला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!