“नागपंचमी : श्रद्धेचा उत्सव की पर्यावरण जपण्याचा संकल्प ?”

– सुरेश मंत्री, अंबाजोगाई
(संपर्क – ९४०३६५०७२२)

श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, पारंपरिक उत्सवांची रेलचेल आणि पावसाच्या सरीत न्हालेला निसर्ग. या पवित्र महिन्यात येणारा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. जनमानसात नागदेवतांप्रती असलेली श्रद्धा आणि आदर यातून हा सण दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र या पारंपरिक श्रद्धेच्या पलीकडे जाऊन आपण सापांविषयी जागरूकता निर्माण करणे, अंधश्रद्धा दूर करणे, आणि पर्यावरणपूरक विचार रूजवणे ही आजची खरी गरज आहे.

पारंपरिक पूजापद्धती आणि श्रद्धा

नागपंचमीच्या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून, नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. हळद-चंदनाने पाटावर नाग-नागीण व त्यांची पिल्लांची चित्रे रेखाटली जातात. त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. विशेषत: उकडीच्या पुरणाच्या दिंडीने पूजेला पूर्णत्व दिले जाते. या सर्व पूजांमागे निसर्गाशी सुसंवाद साधण्याची परंपरा आहे.

साप – अंधश्रद्धा विरुद्ध वैज्ञानिक दृष्टीकोन

आपल्याकडे अजूनही अनेक ठिकाणी सापांना दूध पाजले जाते, त्यांच्यावर हळद-पिंजर लावली जाते. परंतु ही कृती सापाच्या आरोग्यास हानिकारक आहे. साप सस्तन प्राणी नसल्यामुळे दूध त्याच्या पचनसंस्थेला योग्य नाही. दूध देणे म्हणजे त्याला त्रासदायक अन्न देणे होय. तसेच हळद किंवा पिंजर ही त्याच्या संवेदनशील कातडीला हानी पोहोचवते. साप पूजा करावी, पण ती अशा प्रकारे जिवंत सापांना त्रास न होता व्हावी, हे लक्षात घ्यावे.

साप: मानवाचा उपकारक मित्र

सापाचा उल्लेख ‘शेतकऱ्याचा मित्र’ म्हणून केला जातो. याचे कारण म्हणजे साप उंदीर, घुशी यांसारख्या पिकनाशक प्राण्यांचे नियंत्रण ठेवतो. त्यामुळे सापाचा नैसर्गिक परिसंस्थेतील सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. एवढेच नव्हे तर सापाच्या विषातून बनवलेली औषधे आज अनेक जीवघेण्या आजारांवर उपयुक्त ठरत आहेत. संशोधनानुसार, काही विशिष्ट सापांच्या विषापासून तयार होणाऱ्या औषधांचा उपयोग हार्ट अटॅक, पक्षाघात व काही प्रकारच्या कर्करोगावरही केला जात आहे.

सर्पमित्र – जीवाचे रक्षण करणारे निसर्गाचे रक्षक

आपल्या घराच्या किंवा परिसरात साप दिसला की आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे “काठी उचला!”. ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. सर्पांच्या सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रजातींपैकी केवळ चार – नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे – या विषारी आहेत. बहुतेक साप बिनविषारी असून ते फक्त आपले संरक्षण करण्यासाठी चावतात, आक्रमण करण्यासाठी नव्हे.

अशा वेळी योग्य पद्धतीने सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडणाऱ्या सर्पमित्रांची भूमिका फार मोलाची आहे. हे सर्पमित्र पूर्णतः स्वयंसेवीभावनेने कार्य करतात. ते सापांना न मारता त्यांचे संरक्षण करतात, नागरिकांची भीती दूर करतात आणि एक प्रकारे पर्यावरण साखळीचा तोल सांभाळतात.

शासनाचा दिलासा – सर्पमित्र आता ‘फ्रंटलाईन वर्कर’

अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता राज्य शासनाने सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करून यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. आता प्रत्येक अधिकृत सर्पमित्राला १० लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाणार असून, त्यांना अधिकृत ओळखपत्रेही दिली जातील. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्यास मान्यता, सुरक्षितता आणि प्रोत्साहन मिळणार आहे.

उत्सव, श्रद्धा आणि शाश्वत पर्यावरण यांचा संगम

नागपंचमी ही केवळ पूजाअर्चेची परंपरा नाही, तर ती निसर्गाशी नाते घट्ट करणारा आणि त्याचे रक्षण करण्याचा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे सापांविषयी असलेल्या चुकीच्या समजुती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे गरजेचे आहे.

आज नागपंचमी साजरी करताना एक नवा विचार मनात ठेवूया –
“सापाला मारू नका, त्याला समजून घ्या… तो तुमचाच मित्र आहे!”
“पूजा करा – पण निसर्गाचा अपमान न करता!”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!