श्री बुवाजी बाबा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात थाटात संपन्न!

पालखीच्या पवित्र छायेत निऱ्हाळे नगरीचे अध्यात्मिक मंगलमय वातावरण”

 चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

सिन्नर,/ लोकवेध live न्यूज

सालाबादप्रमाणे यंदाही प.पू. महंत बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या कृपाशिर्वादाने श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सव आणि भव्य पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी हा भव्य सोहळा निऱ्हाळे (फत्तेपूर) येथे थाटात संपन्न झाला.

यावेळी पालखीचे पूजन राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजीतसिंह देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पूजनानंतर पालखी सोहळ्याला भक्तजनांच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरुवात झाली. संपूर्ण गाव आणि परिसर भक्तीमय वातावरणाने भारले गेले होते.

त्यानंतर रणजितसिंह देशमुख म्हणाले की “श्री बुवाजी बाबांची कृपा आणि अशा आध्यात्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी म्हणजे भाग्यच आहे. गावोगावच्या लोकांच्या श्रद्धा, भक्ती आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीचे खरे बलस्थान आहे. धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर एकात्मता, बंधुता आणि समाजसेवेचे अधिष्ठान आहे. अशा सोहळ्यांनी समाज अधिक सशक्त, सुसंस्कृत आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होतो.”

सोहळ्याच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प.पू. महंत बुवाजी दादा पुणेकर आणि महंत उमाजी दादा पुणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. देवस्थानचे प.पू. महंत बबनराव महादू सांगळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा औक्षण, पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.

या पर्वणीला श्री बुवाजी बाबा भक्त मंडळ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. संपूर्ण निऱ्हाळे गाव भक्तांनी सजवले होते. महिला भाविकांनी फुलांच्या रांगोळ्या, लेझीम पथक आणि टाळमृदुंगाच्या गजरात पालखीला सश्रद्धतेने वंदन केले.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी सजवलेले तोरण, दिवे आणि फुलांच्या आरास लक्षवेधी ठरली. उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. पालखी मार्गावर वातावरणात “बोल बुवाजी बाबा की जय!” चा जयघोष अखंड घुमत होता.

या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणाऱ्या श्री बुवाजी बाबा भक्त मंडळाचे गावकऱ्यांनी व सर्व भाविकांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.
यात्रा उत्सवाचे हे अध्यात्मिक सोहळे भाविकांच्या श्रद्धेची आणि एकतेची अमूल्य प्रचिती देणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!