शांतीदूताची आफ्रिका सफर : “सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया” या संदेशासाठी रत्नाकर शेजवळ केन्या दौर्‍यावर

नाशिक /  लोकवेध live न्यूज

सद्भावना, शांती व मैत्रीचा संदेश घेऊन जगभर सायकलवरून प्रवास करणारे नाशिकचे शांतीदूत रत्नाकर शेजवळ सध्या आफ्रिकेतील केन्या देशाच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी “सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया” हा संदेश घेऊन केन्याच्या किटाले येथील विपश्यना केंद्रात दोन दिवस धम्मसेवा केली. त्यानंतर नौरोबी, मोबांसा, लेक नाकुरू, आबोंसली व मसाईमारा या ठिकाणी भेट देत शांती व मैत्रीचा संदेश पोहोचवत आहेत.

या प्रेरणादायी यात्रेसाठी प्रणय वाळुंद्रे (नागपूर), राजेश उबंरकर (दुबई) आणि गुणवंत चव्हाण (नाशिक) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

रत्नाकर शेजवळ हे आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट असून, त्यांचा प्रवास केवळ भौगोलिक नसून, तो माणुसकी, धर्मनिरपेक्षता आणि जागतिक बंधुभाव यांचा जागर करणारा आहे. याआधी त्यांनी स्नेहालयचे मा. गिरीष बाबा कुळकर्णी यांच्याअंतर्गत अहमदनगर (महाराष्ट्र) ते नौखाली (बांगलादेश) अशी सद्भावना सायकल रॅली यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

तसेच मा. सूर्यकांत भिसे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते घुमान (पंजाब) मार्गे कर्तारपूर (पाकिस्तान) पर्यंत संत नामदेव यांच्या जयंतीनिमित्त सायकल यात्रा करून त्यांनी प्रेम, शांतता आणि धार्मिक ऐक्याचा संदेश दिला होता.

डॉ. आबा पाटील रॉयल रायडर ग्रुप तर्फे आयोजीत मनाली ते लेह पर्यंत ‘आझादी का अमृत महोत्सव’ सायकल मोहीम तसेच पानिपत ते नाशिक अशी ‘मराठी शौर्य दिन’ निमित्त सायकल मोहीम देखील त्यांनी पूर्ण केली आहे.

गेल्या २१ वर्षांपासून सतत शांती, मैत्री आणि मानवतेचा प्रचार करत असलेल्या रत्नाकर शेजवळ यांनी भारतातील २७ राज्ये आणि महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी १८ राज्ये व २० जिल्ह्यांचा प्रवास सायकलवरून करून त्यांनी शांतीसंदेश पोहोचवला आहे.

भारताबरोबरच त्यांनी नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांमध्ये सुद्धा आपल्या सायकल यात्रेद्वारे “मानवतेचा संदेश” दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत गेल्या वर्षी नूतन गुळगुळे फाउंडेशन तर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

केन्या दौरा पूर्ण होताच ते पुढे उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिझस्थान या देशांच्या यात्रेवर निघणार आहेत.

रत्नाकर शेजवळ यांची ही सायकल मोहीम म्हणजे एक चालती-बोलती शाळा आहे – जिथे देश, धर्म, भाषा, वंश या साऱ्या सीमांना मागे टाकून माणुसकीच्या तत्वांचा प्रसार होतो आहे. अशा शांतीदूतांना अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!