कनोलीत ग्रामसभेत भ्रष्टाचाराचे बॉम्बस्फोट – सरपंचाने मान्य केले आरोप, जाहीर माफी मागितली !
घरकुल वाळू प्रकरण ठरलं केंद्रबिंदू” विखे गटांच्या सरपंचावर माफी मागण्याची नामुष्की
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली गावात गुरुवार दि. 28 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गावभर एकच खळबळ उडाली. यावेळी ग्रामस्थांसमोर सरपंचांनी काही आरोप मान्य करत भरसभेत जाहीर माफी मागितली, तसेच अवैधरीत्या घेतलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.
या ग्रामसभेत थोरात गट आणि विखे गटातील जुनी राजकीय कुरघोडी स्पष्टपणे दिसून आली. संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात समर्थकांनी सरपंचावर दलित वस्ती निधीचा गैरवापर, रस्त्याच्या मुरुमीकरणासाठी आलेला निधी हडप करणे, घरकुल वाळू परवानगीचा गैरवापर करून घरकुल धारकांकडून पाच ब्रास वाळूसाठी तब्बल अकरा हजार रुपये उकळणे असे थेट आरोप केले. या ग्रामसभेत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनीही सरपंचावर आरोप केले व यावेळी येथे विखे पाटलांचा कार्यकर्त्यांनी विखे पाटलांचे नाव बदनाम करू नका असेही सरपंचांना सुनावण्यात आले
ग्रामसभेत वातावरण तापले असतानाच वाळू संदर्भात घरकुल लाभार्थ्यांना सरपंच भाऊसाहेब पवार यांनी “खर्चाव्यतिरिक्त घेतलेले पैसे मी परत करेन” असे सांगत ग्रामस्थांची माफी मागितली. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून “गावाच्या विकासाचा निधी लुटणाऱ्या सरपंचांना पदावर राहण्याचा अधिकार नाही” अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
या ऐतिहासिक ग्रामसभेला संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वर्पे, लहान भाऊ वर्पे, गौरव जगताप, सचिन वर्पे, राजेंद्र वर्पे, स्वप्नील वर्पे, शिवाजी जगताप, अनिल वर्पे, संदीप वर्पे, संतोष वर्पे, भारत जगताप, मदन वर्पे, रामदास वर्पे, ऋषी वर्पे, आकाश वर्पे, दत्तू वर्पे, साहेबराव वर्पे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर ग्रामपंचायतीकडून सरपंच भाऊसाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य बंडू वर्पे, राधाकिसन काकड, अण्णा वर्पे, छबू पगारे, पोलीस पाटील नानासाहेब वर्पे, डॉ. केकान, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामसभेत सरपंचाच्या कबुलीनंतर गावात आता पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे..
