*मुलं सांभाळताना..*
मुलं सांभाळताना… प्रेम, संयम आणि जबाबदारीची कसोटी

परवा एक शिक्षक मित्र भेटले. त्यांचा चेहरा पडलेला पाहून मी त्यांना विचारले. ‘काय झाले सर? खूप नाराज आहात.’ त्यावर ते म्हणाले,’ काय सांगावे तुम्हाला, नोकरी करावी की नाही ? असा प्रश्न पडला आहे ! वर्गामध्ये एक मुलगा खूप गोंधळ घालत होता. त्याला समज देऊनही तो ऐकत नव्हता. त्यावेळी मी त्याला एक फटका मारला. हे त्या मुलांने घरी जाऊन सांगितले. त्याचे पालक शाळेत आले. मुख्यध्यापकाकडे तक्रार केली.मुख्यध्यापकांनी मला ऑफिसमध्ये बोलवून घेतले. त्या मुलाची आणि पालकाची क्षमा मागायला लावली.त्यावर ते पालक म्हणाले, “तुम्ही तुमचे पहा.आमच्या मुलांना सुधारायच्या भानगडीत पडू नका.” परत जर मुलाला मारले तर तुमची तक्रार पोलीसात करू.” असे म्हणत, ते पालक निघून गेले.’
‘या गोष्टीचा फायदा घेत तो मुलगा रोज शाळेत गोंधळ घालत असतो. शिकणाऱ्या मुलांना त्रास देत असतो. मग सांगा कसे काम करायचे शाळेमध्ये ? अनेक विद्यार्थी शिक्षकांना उलट बोलतात. का तर धाकचं राहिला नाही. सरकारने त्यात असे कायदे काढले आहेत. मुलांकडे रागाने पाहायचे नाही. त्यांचा अपमान होईल, असे बोलायचे नाही,त्याला मारायचे नाही, प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक मूल आपलसं असतं .त्याला घडविण्यातच आनंद असतो. कुठल्या शिक्षकाला विद्यार्थ्याला मारल्यानंतर समाधान मिळत असेल? आपण घरी मुलांना थोडीफार शिक्षा करतच असतो ना? त्याच्यामागे काही वेगळा उद्देश असतो का ? त्यांनी संस्कारी होऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे हाच उद्देश प्रत्येक शिक्षकाचा असतो. परंतू पालकच आपल्या मुलांना पाठिशी घालत असतील तर कसे देशाचे भवितव्य घडेल. लहान वयात मुलांच्यावर योग्य संस्कार केले नाही तर हेच पालक उद्या डोक्याला हात लावून बसतील.’ असे म्हणून सर निघुन गेले.
सरांच्या नाराजीतून जे शब्द निघाले ते खरंच काळजी करण्यासारखे आहेत. आज मुलांचे आपण हवे ते लाड करत असतो. आपल्यामध्ये क्षमता असतात तोपर्यंत आपण त्यांचे लाड पुरवू शकतो परंतु ज्यावेळी ही मुले मोठी होतात.त्यावेळी कष्ट करण्याची सवयी मुलां मध्ये राहिलेली नसते. त्यावेळी या मुलांचे काय ? आयुष्यभर तर आपण यांना पुरू शकत नाही. मुलं ही कोऱ्या पाटी सारखी असतात. त्यावर काय लिहायचे, हे आपल्या हातात असते. मुलं ऐकत नाहीत असे ज्यावेळी ऐकायला मिळते त्यावेळी कुठेतरी आपलेच संस्कार कमी पडल्यासारखे वाटते. लहानपणी एखादा छोटा मुलगा, मुलगी चांगली गोष्ट करू किंवा वाईट गोष्ट करू, त्या मुलाची प्रशंसा केली जाते. यातूनच त्याला बळ मिळत जाते. मग आपण काहीही करा आपल्याला कोणीच काही करत नाही. असाच त्याचा भ्रम निर्माण होऊन बसतो.
मुलं संभाळणे हे खूप जबाबदारीचे काम आहे.परंतू याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. पहिला काळ वेगळा होता. समाजाचा धाक होता. त्यामुळे कोणतेही वाईट कृत्य करताना मुलं हजार वेळा विचार करायची. परंतु आजच्या मुलांची विचार करण्याची प्रवृत्तीच नाहीशी झाल्यासारखे दिसत आहे. मोबाईल मध्ये हवे ते पाहायला मिळत आहे.दिवसभरातील कित्येक वेळ, मुलं मोबाईलवर घालवत असतात. शरीराकडे लक्ष नाही,फास्ट फूड,रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे यामुळे मुलं चिडचिडी होताना दिसत आहेत. कित्येक पालक आणि मुलं मोबाईल किंवा टि.व्ही चालू असल्याशिवाय जेवत नाहीत . मुलं ही आई वडिलांचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे पालकांनी मुलांना सांगण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडविणे खूप गरजेचे आहे. आपल्या मुलांचे मित्र कोण? ते जास्त वेळ काय पाहतात ? काय बोलतात ? यावरच त्यांचे भवितव्य घडत असते. ‘द टॉप फाइव रिग्रेट्स ऑफ द डाइंग ‘ या पुस्तकाच्या लेखिका ‘ब्रोनी वेयर’ यांनी वातावरणाचा व संगतीचा परिणाम कसा आपल्या जीवनावर होतो. हे ‘टॉप फाइव रिग्रेट्स ऑफ द डाइंग ‘ या पुस्तकातील ‘परिस्थितीची शिकार’ या प्रकरणात तिचे आणि अँथनी नावाच्या तरूणाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे .
योग्य वातावरण, आई वडीलांचे योग्य संस्कार, शिक्षकांचे ज्ञान व सरकारने मुलांच्या हिताचे कायदे केले तर प्रत्येक मूलाचा सर्वांगीण विकास होईल. असे मला वाटते.

✍🏻
*परशुराम नागरगोजे, जामखेड.*
संपर्क क्रमांक:- ९८२३०९११४७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!