जिल्हास्तरीय गणित–विज्ञान प्रदर्शनात सह्याद्री विद्यालयाचा दबदबा; कु. सोहम सोनवणे जिल्ह्यात प्रथम, शर्वरी खेबडे द्वितीय
संगमनेर
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील नागेश विद्यालयामध्ये नुकतेच पार पडलेल्या ५३ व्या जिल्हास्तरीय गणित–विज्ञान प्रदर्शनात भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. या प्रदर्शनात कु. सोहम भाऊसाहेब सोनवणे याने गणित विभागातील दिव्यांग गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याच्या या यशामुळे संगमनेर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
कु. सोहम सोनवणे याने यापूर्वी तळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय गणित–विज्ञान प्रदर्शनातही गणित विभागातील दिव्यांग गटात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या यशाच्या जोरावर त्याने जामखेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. जिल्हास्तरावर सादर केलेल्या त्याच्या गणितीय संकल्पना, मांडणी, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल झालेल्या समारंभात जिल्ह्याचे मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते कु. सोहम सोनवणे याचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. दिव्यांग असूनही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
याच प्रदर्शनात सह्याद्री विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. शर्वरी खेबडे हिने देखील उल्लेखनीय कामगिरी करत नववी ते बारावी गटातील गणित विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे तिलाही संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. तिच्या उपकरणाची संकल्पना, अचूक गणितीय विश्लेषण आणि सुस्पष्ट मांडणी यांचे परीक्षकांनी कौतुक केले.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाची गौरवशाली शैक्षणिक परंपरा अखंडितपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षीदेखील विद्यालयाचा विद्यार्थी पियुष पर्वत याने संगमनेर तालुक्यात गणित विभागात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चेअरमन मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे, सेक्रेटरी मा. सुमंतजी कोल्हे, आमदार सत्यजित दादा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, संचालक प्रा. बाबा खरात सर, विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस. एम. खेमनर सर, उपमुख्याध्यापिका सुरेखा दिघे मॅडम, पर्यवेक्षिका एस. आर. रणशूर मॅडम, पर्यवेक्षक के. डी. देशमुख सर, दिघे ए. टी. सर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे रवींद्र अभंग सर, स्मिता भोर मॅडम, मयुरी वायाळ मॅडम, शरद नवले सर यांचेही कौतुक करत सर्वांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
